अव्हेन्यू सुपरमार्टने कमावला तिमाहीत 743 कोटी रुपयांचा नफा
वृत्तसंस्था, मुंबई
रिटेलचेन क्षेत्रातील कंपनी डीमार्ट चालवणाऱ्या अव्हेन्यु सुपरमार्टचा तिमाही निकाल जाहीर झाला असून कंपनीने दुसऱ्या तिमाहीत 743 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा प्राप्त केल्याची माहिती आहे. वर्षाच्या आधारावर पाहता कंपनीने आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत नफ्यात जवळपास 8.5 टक्के इतकी वाढ नोंदवली आहे.
मागच्या वर्षी दुसऱ्या तिमाहीत कंपनीने 685 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला होता. जुलै ते सप्टेंबर अवधीत कंपनीने 19644 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला असून वर्षाच्या आधारावर हा महसूल 18 टक्के अधिक दिसून आला आहे. मागच्या वर्षी याच अवधीत कंपनीने 16676 कोटी रुपयांचा महसूल मिळवला होता. वस्तु व सेवा विक्रीतून मिळणारी रक्कम ही महसूल मानली जाते. कंपनीने आर्थिक वर्ष 2027 मध्ये आतापर्यंत 18 नवी स्टोअर्स सुरु केली आहेत. यासह देशात कंपनीची एकूण स्टोअर्सची संख्या आता 518 वर पोहचली आहे.
समभागावर परिणाम
डीमार्ट चालवणाऱ्या अव्हेन्यू सुपरमार्टचा समभाग सोमवारी निकालानंतर 4 टक्के इतका घसरणीत राहिला होता. आधीच्या 3520 रुपयांच्या बंद भावाच्या तुलनेत समभाग सोमवारी 3520 रुपयांवर खुला झाला होता. समभाग असाच इंट्रा डेत 4.4 टक्के इतका घसरत 3366 रुपयांवर नीचांकी स्तरावर आला होता. तज्ञांच्या अंदाजाप्रमाणे कंपनीने नफा, महसुल प्राप्त केला नसल्याने समभाग दबावात राहिला होता.
जुलै ते सप्टेंबर अवधीतील कामगिरी
आर्थिक वर्ष 2027 आर्थिक वर्ष 2026
परिचालन महसूल 19644 कोटी 16676 कोटी
एकूण उत्पन्न 19658 कोटी 16696 कोटी
एकूण खर्च 18633 कोटी 15751 कोटी
निव्वळ नफा 743 कोटी 685 कोटी
