हिमलुंग हिमाल बेस कॅम्पमध्ये हिमस्खलन,10 गिर्यारोहक बेपत्ता
मनांग:
नेपाळच्या मनांग जिल्ह्यातील तिबेट सीमेनजीक हिमलुंग हिमालच्या बेस कॅम्पवर रविवारी सकाळी हिमस्खलन झाले. या 7126 मीटर उंच पर्वतावरून 10 गिर्यारोहक बेपत्ता झाले आहेत. यातील दोन जण इमेजिन नेपाळ प्रायव्हेट लिमिटेडशी तर 8 जण हिमालयन हॉलिडेज नेपाळशी संबंधित होते अशी माहिती एक्सपेडियन ऑपरेटर्स असोसिएशन नेपाळचे महासचिव ऋषी भंडारी यांनी दिली आहे. मागील आठवड्यात हवामानसंबंधी इशारा मिळाल्यावर बहुतांश पथके आणि मदत पथकांनी पर्वतीय उतारावरून उतरत सुरक्षित स्थळी धाव घेतली होती. परंतु काही लोक अनिच्छेने मागे राहिले होते. अनेक दिवसांच्या प्रचंड हिमवृष्टीमुळे गिर्यारोहण रोखण्यात आले होते. बेपत्ता लोक हे वेगवेगळ्या मिशन कंपन्यांशी संबंधित आहेत.
तेथील स्थितीवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. बेपत्ता लोकांचा शोध लावत त्यांना वाचविण्याचे प्रयत्न केले जात आहे. हिमलुंग हिमालवर हेलिकॉप्टर उड्डाणांसाठी अतिरिक्त परवान्याची गरज भासत असल्याने तेथे पोहोचणे अवघड ठरते. हे शिखर उंचीचा अनुभव घेणाऱ्या गिर्यारोहकांदरम्यान लोकप्रिय असल्याचे नेपाळच्या पर्यटन विभागाचे महासंचालक रामकृष्ण लामिछाने यांनी सांगितले आहे.
प्रतिकूल हवामान
हे हिमस्खलन नेपाळमध्ये अतिवृष्टी आणि हिमवृष्टीदरम्यान झाले आहे. बंगालच्या उपसागरात सक्रीय हवामान प्रणालीमुळे पर्वतीय भागांमध्ये हिमवृष्टी तर मैदानी भागांमध्ये सातत्याने पाऊस पडत आहे. शुक्रवारपासून हवामान खराब असून रस्ते प्रभावित झाले असून अनेक हिस्स्यांमधील वाहतूक बंद ठेवावी लागली आहे. पर्यटन अधिकाऱ्यांनी ट्रेकर्स आणि गिर्यारोहकांना स्वत:ची मोहीम स्थगित ठेवण्याचे आवाहन केले आहे.