महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ऑटोरिक्षांना मीटरसक्ती; वर्दीच्या रिक्षांनाही लावणार नियम

11:29 AM Sep 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रस्ते सुरक्षितता समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

Advertisement

बेळगाव : पुढील महिन्यापासून बेळगावात ऑटोरिक्षांना मीटरसक्ती करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बुधवारी ही माहिती दिली आहे. यासंबंधी प्रादेशिक परिवहन व पोलीस अधिकाऱ्यांनी ऑटोरिक्षा संघटनेच्या नेत्यांशी चर्चा करण्याची सूचनाही केली आहे. बुधवार दि. 25 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा रस्ते सुरक्षितता समिती व प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्षपदावरून बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा मीटरसक्तीची वाच्यता केली असून बेळगावात ऑटोरिक्षांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नव्या रिक्षांची नोंदणी स्थगित करण्यासंबंधी रिक्षा संघटनांनी विनंती केली आहे. यासंबंधी विचार करून निर्णय घेण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

Advertisement

बेळगाव शहर व जिल्ह्यातील अपघातप्रवण ठिकाणे निश्चित करून त्यांची दुरुस्ती करावी, अपघात टाळण्यासाठी प्रयत्न करावेत, गेल्या तीन वर्षांत झालेल्या अपघातांची संख्या, अपघातातील मृतांची संख्या व ब्लॅकस्पॉटसंबंधी सविस्तर अहवाल देण्याची सूचना करण्याबरोबरच ब्लॅकस्पॉटमध्ये अपघात घटविण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. पंचायतराज इंजिनिअरिंग विभाग व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे सर्वेक्षण करून जिल्ह्यात अधिकाधिक अपघात घडणाऱ्या ब्लॅकस्पॉटसंबंधी माहिती द्यावी, बेळगाव महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुस्थितीत आहेत का? याची खात्री करून घ्यावी. शहर परिसरात वेगावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचनाही त्यांनी केली.

रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घ्यावे, संबंधित खात्यांनी समन्वयाने काम करावे, दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करणे सक्तीचे आहे. यासंबंधी जागृती करावी, हेल्मेट परिधान न करणाऱ्या दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी सूचना करतानाच क्षमतेपेक्षा अधिक शाळकरी मुलांना कोंबणाऱ्या वर्दीच्या ऑटोरिक्षा चालकांची परवानगी रद्द करण्याची सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. यावेळी जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी वाहतूक नियम मोडल्यामुळे रद्द झालेल्या ड्रायव्हिंग लायसेन्ससंबंधी माहिती देण्याची सूचना प्रादेशिक परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांना केली. याबरोबरच समाजमाध्यमावर तशा वाहनचालकांची नावे प्रसारित करण्याची सूचनाही त्यांनी केली. नशेत वाहने चालविणे, वाहने चालविताना मोबाईलचा वापर करणे आदी प्रकरणात दंडात्मक कारवाई करावी. सातत्याने वाहनांसंबंधी कागदपत्रांची पडताळणी करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख श्रुती, पोलीस उपायुक्त निरंजन राजे अरस, सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंते एस. बी. सोबरद यांच्यासह रस्ते सुरक्षितता समितीचे सदस्य उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article