आजपासून वाहन क्षेत्राचे नियम बदलणार
गाड्या महागणार, ई 20 इंधनही आणले जाणार
नवी दिल्ली :
येत्या काही दिवसांत नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर वाहन क्षेत्रातील काही नवीन नियमांबद्दलची माहिती जाणून घ्यावी लागणार आहे. यामध्ये आजपासून म्हणजेच 1 एप्रिल 2026 पासून ऑटो क्षेत्राचे काही नियम बदलणार आहेत. नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीबरोबरच ऑटो क्षेत्रात अनेक मोठे बदल होणार आहेत.
गाड्या महागणार
आजपासून पासून नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीबरोबरच अनेक गाड्या महाग होणार आहेत. अनेक ऑटो कंपन्या त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवणार आहेत. यामध्ये टाटा मोटर्स, बीएमडब्ल्यू, मर्सिडीज-बेंझ आणि एमजी मोटर यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. लक्झरी कार उत्पादक बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज-बेंझ गाड्यांच्या किमती प्रत्येकी 2 टक्क्यांनी वाढवत आहेत. त्याचबरोबर, कार उत्पादक एमजी मोटर देखील किमती वाढवत आहे. होंडा मोटर्स सर्वात आधी आपल्या किमती वाढवत आहे.
देशभरात ई20 इंधनाचा वापर
1 एप्रिलपासून होणारा आणखी मोठा बदल म्हणजे देशभरात ई 20 इंधन अनिवार्य केले जाणार आहे. ई 20 इंधनामध्ये 20 टक्के इथेनॉल आणि 80 टक्के पेट्रोल असते. पेट्रोल-डिझेलची आयात कमी करणे आणि प्रदूषण कमी करणे हा याचा उद्देश आहे. नवीन गाड्या ई 20 इंधनावर सहज चालतील. मात्र, यामुळे जुन्या वाहनांचे मायलेज 3 ते 7 टक्क्यांनी कमी होऊ शकते.