वाहन कंपन्या वाढवणार उत्पादनाचा वेग
मारुती, ह्युंडाई,टाटा मोटर्सचा समावेश
वृत्तसंस्था/ नोएडा
सप्टेंबर 2025 मध्ये सरकारने जीएसटी दरामध्ये मोठा बदल करत आधीच्या तुलनेमध्ये दरात सवलत जाहीर केली. जीएसटी सवलतीमुळे कारच्या मागणीत वेगाने वाढ दिसून आली. आता मागणी पूर्ण करण्यासाठी कंपन्या उत्पादन वाढवणार आहेत. सरकारने कारवर लावला जाणारा जीएसटी दर 28 वरून 18 टक्क्यांवर कमी केला. त्यामुळे कारच्या किमती कमी झालेल्या पाहायला मिळाल्या. गेल्या महिन्यात कार्सची मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी मागणी नोंदवली होती. या मागणी वाढीच्या पार्श्वभूमीवर कंपन्या आता आपल्या कार उत्पादन वाढीवर लक्ष केंद्रित करत आहेत. तशी आगामी काळात कंपन्यांनी योजनाही आखली आहे.
इतके वाढवणार उत्पादन
येणाऱ्या काळात कंपन्या 20 ते 40 टक्के उत्पादनामध्ये वाढ करतील असे म्हटले जात आहे. मारुती सुझुकी ही देशातील दिग्गज कार निर्माती कंपनी या महिन्यातच 2लाख कार्स उत्पादन करण्याचे उद्दिष्ट बाळगून आहे. सप्टेंबर 2025 मध्ये कंपनीचे सरासरी मासिक उत्पादन 1 लाख 72 हजार इतके राहिले होते.
याच दरम्यान या क्षेत्रातील आणखी एक ऑटो कंपनी ह्युंडाई मोटर्स सुद्धा आपल्या कार उत्पादनामध्ये 20 टक्के वाढ करणार आहे. कंपनी आता दोन शिफ्टमध्ये कामगारांना बोलावणार आहे. महाराष्ट्रातील तळेगाव येथील कारखान्यामध्ये कारचे उत्पादन घेतले जात आहे.
टाटाही वाढवणार उत्पादन
यांच्यासोबत टाटा मोटर्सनेसुद्धा आपल्या महिन्याच्या कार उत्पादनामध्ये वाढ करण्याचे ठरवले आहे. येणाऱ्या काळात दर महिन्याला 65000 ते 70 हजार गाड्यांची निर्मिती करण्याचे नियोजन कंपनीने केले आहे. आर्थिक वर्षामध्ये पहिल्या सहा महिन्यांमध्ये पाहता कंपनीने दर महिन्याला 47 हजार कार्सचे उत्पादन घेतले होते. ऑक्टोबरमध्ये कार्सना ग्राहकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. याच दरम्यान पॅसेंजर वाहनांची विक्री 5 लाख 50 हजारच्या पार गेली होती. मागणीतील वाढ पाहता विविध कंपन्या आता वाढीव मागणी पूर्ण करण्यासाठी उत्पादन वाढवण्याची तयारी करत आहेत.