For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ग्रामपंचायतीमध्ये स्वयंचलित हवामान केंद्रे उभारणार

05:58 PM Sep 12, 2025 IST | Radhika Patil
ग्रामपंचायतीमध्ये स्वयंचलित हवामान केंद्रे उभारणार
Advertisement

सांगली :

Advertisement

सांगली केंद्र शासनाच्या वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डाटा सिस्टीम म्हणजेच विंडस् प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील सर्व ६९६ ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहेत. यामुळे २४ तास हवामान निरीक्षण केले जाणार आहे. इंटरनेट, मोबाईल अॅ पद्वारे हवामान घटकांबाबतची माहिती उपलब्ध होणार असल्याने ही स्वयंचलित हवामान केंद्रे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहेत.

विंडस् प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील ६९६ ग्रामपंचायत स्तरावर प्रथम प्राधान्याने शासकीय जागेत स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहेत. यामध्ये मिरज तालुक्यात ६४, तासगाव ६८, क. महांकाळ ५९, जत ११६, खानापूर ६४, आटपाडी ५३, कडेगाव ५४, पलूस ३३, वाळवा ९४ आणि शिराळा तालुक्यात ९१ स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यात येणार आहेत.

Advertisement

काकडे म्हणाले, नैसर्गिक आपत्तीमुळे नेहमीच शेतीपिकांचे नुकसान होते. नुकसानीच्या नोंदी तात्काळ उपलब्ध होत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळत नाही. या सर्व प्रकारावर स्वयंचलित हवामान केंद्रामुळे मात करता येणार आहे. प्रशासनास अतिवृष्टीची अचूक व वेळेत माहिती मिळणार आहे. स्वयंचलित हवामान केंद्रामुळे दैनंदिन पर्जन्यमान, तापमान, वाऱ्याचा वेग इत्यादी माहिती वेळेत मिळण्यास मदत होईल. गावागावातील नुकसानीचा खरा अहवाल शासकीय यंत्रणेपुढे जलदतेने येण्यास मदत होणार आहे. लवकरच शासनाकडून ही केंद्रे बसवण्याची प्रक्रिया सुरू होईल.

यापूर्वी केवळ महसूल मंडळ स्तरावर ही आकडेवारी उपलब्ध होत होती. स्वयंचलित हवामान केंद्रे उभारल्यानंतर ती प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध होणार आहे. या केंद्रांमुळे २४ तास हवामानाचे निरीक्षण होऊन इंटरनेट, मोबाईल अॅपद्वारे ही रिअल टाईम माहिती उपलब्ध होणार आहे. प्रशासनास अतिवृष्टीची अचूक माहिती मिळणार आहे. अचानक उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीची माहिती यापुढे ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध होणार असल्याने क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे वेळेत होऊन बाधितांना तातडीने नुकसानभरपाई मिळण्यास मदत होणार आहे.

  • शेतकऱ्यांना उपयुक्त मार्गदर्शन

स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी करण्यात आल्यास चक्रीवादळ, दुष्काळ, आग, पूर, गारपीट, ढगफुटी, थंडीची लाट अशा नैसर्गिक आपत्तीची माहिती प्राप्त होईल. या अनुषंगाने हवामानविषयक माहिती ग्रामपंचायत स्तरावरच उपलब्ध होईल. या केंद्रांमुळे पर्जन्यमान, तापमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग या हवामानविषयक घटकांची माहिती मिळेल. स्वयंचलित हवामान केंद्रांद्वारे प्राप्त माहितीचा वापर एआय तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे संकलन, विश्लेषण करुन शेतकऱ्यांना योग्यवेळी मार्गदर्शन करणेस उपयुक्त ठरेल.

Advertisement
Tags :

.