शॉर्ट सर्किटमुळे अॅटो गॅरेजला आग! मोठे नुकसान; अग्निशामकदल घटनास्थळी दाखल
पुलाची शिरोली/वार्ताहर
नागाव ( ता. हातकणंगले ) येथील श्री दत्त अॅटो गॅरेजला शॉर्ट सर्किटमुळे शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास आग लागली. या आगीत गॅरेजचे मोठे नुकसान झाले. पेठवडगाव व कोल्हापूर येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी योग्य खबरदारी घेत आग आटोक्यात आणली. आगीत झालेल्या नुकसानीबाबत रात्री उशिरापर्यंत माहिती घेणे सुरू होते.
पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत महिंद्रा( ट्रेन्डी व्हील्स) शोरूम शेजारी श्री दत्त अॅटो गॅरेज आहे. या गॅरेजमध्ये आयशर कंपनीच्या अवजड वाहनांची दुरुस्ती होते. गॅरेज मालक महेश घाटगे व सचिन हंजे नेहमीप्रमाणे सायंकाळी उशिरा गॅरेज बंद करून घरी गेले. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास गॅरेजमधून धुराचे लोट बाहेर पडू लागले. गॅरेज शेजारी असणार्या गोदाम चालकांनी याची माहिती घाटगे व हंजी यांना दिली.
दरम्यान आगीने रौद्र रूप धारण केले होते. शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात याची माहिती देण्यात आली. त्यानंतर पेठवडगाव व कोल्हापूर येथील अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. रात्री साडेनऊच्या सुमारास ही आग आटोक्यात आली. मात्र संपूर्ण गॅरेज आगीत भस्मसात झाले. यामध्ये आॅईलचे कॅन, कॉम्प्रेसर, स्पेअर पार्ट, पत्र्याचे शेड असे नुकसान झाले आहे.