वाहन कंपन्यांचा स्टील आयातीच्या सुरक्षा शुल्काला विरोध
स्वयंपूर्णतेवरुन मतभेद : आयएसएच्या सदस्यांकडून सरकारला पत्र
नवी दिल्ली :
भारतीय ऑटोमेकर्सनी विशिष्ट दर्जाच्या स्टीलच्या आयातीवर सेफगार्ड ड्युटी लादण्यास तीव्र विरोध केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, स्थानिक पातळीवर उत्पादन करणारे आणि कठोर उत्सर्जन तसेच सुरक्षा मानके पूर्ण करणारे व्यवहार्य पर्याय नसल्यामुळे त्यांना आयात करण्यास भाग पाडले जात आहे.
इंडियन स्टील असोसिएशन (आयएसए) यांनी 19 डिसेंबर 2024 रोजी त्यांच्या सदस्यांवतीने सरकारला पत्र दिले होते, की नॉन अॅलॉय आणि अलॉय स्टीलच्या फ्लॅट उत्पादनावर सेफगार्ड ड्युटी लादली जावी. वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत व्यापार उपाय महासंचालनालयाने (डीजीटीआर) आता त्याची चौकशी सुरु केली आहे. या विशेष स्टील उत्पादनांमध्ये हॉट रोल्ड कॉईल्स आणि शीट्स यांचा समावेश आहे.
ऑटोमोबाईल उत्पादक संघटना (सीयाम) ने 31 डिसेंबर 2024 रोजी एक पत्र लिहून या विशेष स्टील उत्पादनांवर सेफगार्ड ड्युटी लादण्यास तीव्र विरोध केला आहे. देशातील सर्व मुख्य प्रवासी वाहन उत्पादन हे सीयामचे सदस्य आहेत. यावेळी सियामने म्हटले आहे की, ऑटोमोटिव्ह उद्योग प्रथम पर्यायी साहित्य वापरण्याच्या शक्यतांचा विचार करत आहे. उत्सर्जनाशी संबंधित विविध नियामक नियमांचा विचार करण्याच्या तांत्रिक आव्हानांना आणि चांगल्या सुरक्षिततेसह वाहने तयार करण्याची आवश्यकता लक्षात घेत उद्योगाला हे साहित्य आयात करण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान आयएसएचे सरचिटणीस आलोक सहाय म्हणाले की, ही बाब डीजीटीआर अंतर्गत असल्याने आम्ही त्यावर भाष्य करुन इच्छित नसल्याचे स्पष्ट केले आहे. स्टील उद्योगातील सुत्रांनी सांगितले की, वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या बहुतेक ग्रेडच्या स्टीलचे उत्पादन भारतात केले जात आहे.