बालकामगारांच्या सुरक्षेसाठी अधिकाऱ्यांनी पुढे यावे
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांचे अधिकाऱ्यांना आवाहन : बालकामगार योजना संस्थेची बैठक
बेळगाव : जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातील उपाहारगृहे, दुकानांची वेळोवेळी तपासणी करावी, बालकामगार दिसून आल्यास त्यांच्या मुक्ततेसाठी अधिकाऱ्यांनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी झालेल्या जिल्हा कामगार योजना संस्था कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. अथणी, रायबाग, चिकोडी, मुडलगी, गोकाक, कागवाड या तालुक्यांच्या काही भागात बालविवाहाची पद्धत दिसून येते. अधिकाऱ्यांनी वेळोवेळी पाहणी करून बालविवाह रोखावेत. गेल्या तीन वर्षांत बालरक्षण साहाय्यवाणीला कॉल कमी आले आहेत. यातील त्रुटींची पाहणी करून बालरक्षण साहाय्यवाणी तत्पर बनविण्यासाठी प्रयत्न करावेत.
बाल कामगारमुक्त जिल्हा घोषणेसाठी संबंधित अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे सर्वेक्षण हाती घ्यावे. बालकामगारांच्या सुरक्षेसाठी नागरिकांनीही स्वयंप्रेरणेने पुढे यावे. साहाय्यवाणीची मदत घ्यावी. प्रसंगी जनजागृती करावी. प्रत्येक शाळा-महाविद्यालयांच्या रस्त्यांच्या बाजूस असलेल्या भिंतीवर लिखाण करून अधिकाधिक प्रचार करण्यात यावा. भिक्षा मागणाऱ्या मुलांच्या रक्षणाचे कार्यही व्हावे. बाल कामगारीतून मुक्त करण्यात आलेल्या मुलांना महिला-बाल कल्याण खात्याच्या बाल मंदिरातून व्यवस्था करण्यात यावी. तसेच दत्तक स्वीकार केंद्रांमध्येही मुलांची व्यवस्था करणे शक्य आहे. अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी. अनुसूचित जाती-जमातीतील रक्षण करण्यात आलेल्या बालकामगारांची समाज कल्याण खात्याच्या वसतिगृहात व्यवस्था करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.
सक्तीचे शिक्षण धोरणमुळे बाल कामगारांची संख्या कमी
साहाय्यक कामगार आयुक्त देवराज म्हणाले की, बाल कामगारांचे रक्षण करण्याचे कार्य होत असून अशा मुलांना पालकांकडे हस्तांतर करण्यात आले आहे. सक्तीचे शिक्षण धोरण राबविण्यात आल्याने बाल कामगारांची संख्या कमी झाली आहे. रामदुर्ग तालुक्यातील दोन किशोरवयीन बाल कामगारांची मुक्तता करण्यात आली असून ही प्रकरणे न्यायालयात दाखल झाली असल्याची माहिती जिल्हा बाल कामगार योजना अधिकारी ज्योती कांते यांनी दिली. समाज कल्याण खात्याचे संयुक्त संचालक रामनगौडा कन्नोळी, जिल्हा आरोग्य-कुटुंब कल्याण अधिकारी ईश्वर गडादी, जिल्हा कारखान्याचे उपसंचालक व्यंकटेश राठोड, कामगार निरीक्षक मल्लिकार्जुन जोगूर, रमेश केसनूर, संजू भोसले यासह विविध खात्यांचे जिल्हास्तरीय अधिकारी बैठकीला उपस्थित होते.