वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी
भारताचा 6 गड्यांनी पराभव, बेथ मुनी ‘सामनावीर’, अॅश्ले गार्डनरचे 3 बळी, हरमन-स्मृतीची अर्धशतके वाया
वृत्तसंस्था / ब्रिस्बेन
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत मंगळवारी येथे झालेल्या पहिल्या सामन्यात अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर यजमान ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने विद्यमान विश्वविजेत्या भारतीय महिलांचा सहा गड्यांनी पराभव करत विजयी सलामी दिली. अर्धशतक झळकविणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनीला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. भारताच्या स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर यांची अर्धशतके वाया गेली.
ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आलेल्या हरमनप्रीत कौरच्या भारतीय महिला संघाने टी-20 मालिका 2-1 अशी जिंकली. त्यानंतर वनडे मालिकेतील मंगळवारच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत भारताची कामगिरी सरस होऊ शकली नाही. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या शिस्तबध्द आणि अचूक गोलंदाजीसमोर भारताचा डाव 48.3 षटकांत 214 धावांत आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 38.2 षटकांत 4 बाद 217 धावा जमवित हा सामना 70 चेंडू बाकी ठेवून 6 गड्यांनी जिंकला.
भारताच्या डावाला चांगली सुरूवात झाली नाही. पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर सलामीची फलंदाज प्रतीका रावल खाते उघडण्यापूर्वीच पायचीत झाली. त्यानंतर शेफाली वर्मा आणि मानधना यांनी 25 धावांची भर घातल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या ब्राऊनने स्वत:च्याच गोलंदाजीवर वर्माला टिपले. तिने केवळ 4 धावा केल्या. जेमिमा रॉड्रिग्ज 1 चौकारांसह 8 धावांवर बाद झाली.
स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर यांनी चौथ्या गड्यासाठी 48 धावांची भर घातली. मानधनाने 68 चेंडूत 7 चौकारांसह 58 धावा जमविल्या. मानधनाने अर्धशतक 56 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने पूर्ण केले होते. मॅकग्राने तिला किंगकरवी झेलबाद केले. दीप्ती शर्मा केवळ 2 धावांवर झेलबाद झाली. भारताची स्थिती यावेळी 24.1 षटकांत 5 बाद 103 अशी होती. हरमनप्रीत कौरने 84 चेंडूत 3 चौकारांसह 53 धावा जमविल्या तर रिचा घोषने 38 चेंडूत 2 चौकारांसह 23 धावा केल्या. काश्वी गौतमने जोरदार फटकेबाजी करीत 44 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांसह 43 धावा जमविल्याने भारताला 200 धावांचा टप्पा ओलांडता आला. गौतम आणि हरमनप्रीत कौर यांनी सातव्या गड्यासाठी 53 धावांची भर घातली. कर्णधार कौर सातव्या गड्याच्या रुपात बाद झाली. क्रांती गौड आणि श्रीचरणी लवकर बाद झाल्या आणि भारताचा 214 धावांवर समाप्त झाला. ऑस्ट्रेलियातर्फे अॅश्ले गार्डनरने 33 धावांत 3 तर शुटने 42 धावांत 2 तसेच ब्राऊन, किंग, मॅकग्रा आणि मॉलिन्युक्स यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना कर्णधार अॅलिसा हिली आणि लिचफिल्ड यांनी ऑस्ट्रेलियाच्या डावाला दमदार सुरुवात करुन देताना 10.3 षटकांत 55 धावांची भागिदारी केली. श्रीचरणीने लिचफिल्डला यष्टीरक्षक घोषकरवी यष्टीचीत केले. तिने 32 चेंडूत 6 चौकारांसह 32 धावा जमविल्या. श्रीचरणीने ऑस्ट्रेलियाला याच षटकातील पुढच्या चेंडूवर आणखी एक धक्का देताना व्हॉलला मानधनाकरवी झेलबाद केले. अॅलिसा हिली आणि मुनी यांनी तिसऱ्या गड्यासाठी 64 धावांची भागिदारी केली. हिलीने 70 चेंडूत 4 चौकारांसह 50 धावा जमविल्या. क्रांती गौडने तिला झेलबाद केले.
बेथ मुनी आणि सदरलँड या जोडीने चौथ्या गड्यासाठी 85 धावांची भागिदारी करत आपल्या संघाला विजयाच्या समीप नेले. मुनीने 79 चेंडूत 2 षटकार आण 5 चौकारांसह 76 धावा जमविल्या. मुनी बाद झाली त्यावेळी ऑस्ट्रेलियाला विजयासाठी केवळ 11 धावांची जरुरी होती. 38.2 षटकांत ऑस्टेलियाने हे उद्दिष्ट गाठले. सदरलँड 44 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 48 धावांवर तर गार्डनर 5 धावांवर नाबाद राहिल्या. भारतातर्फे श्री चरणीने 2 तर दीप्ती शर्मा आणि क्रांती गौड यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. 
हरमनप्रीत कौर जखमी
भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या गुडघ्याला दुखापत झाली. भारताच्या डावात फलंदाजी करताना हरमनप्रीतच्या गुडघ्याला ही दुखापत झाली. या दुखापतीनंतर ऑस्ट्रेलियाच्या डावात ती मैदानावर क्षेत्ररक्षणासाठी येवू शकली नाही. तिच्या गैरहजेरीत मानधनाने कप्तानपदाची जबाबदारी स्वीकारली होती. हरमनप्रीतच्या दुखापत स्थितीबाबत अद्याप पूर्ण माहिती मिळू शकली नाही. पण तिच्या गुडघ्याचा एक्सरे काढण्यात आला असून ती या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात खेळण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
संक्षिप्त धावफलक: भारत 48.3 षटकांत सर्वबाद 214 (स्मृती मानधना 58, हरमनप्रीत कोर 53, के. गौतम 43, रिचा घोष 23, अवांतर 19, गार्डनर 3-33, शुट 2-42, ब्राऊन, किंग, मॅकग्रा, मॉलिन्युक्स प्रत्येकी 1 बळी), ऑस्ट्रेलिया 38.2 षटकांत 4 बाद 217 (बेथ मुनी 76, हिली 50, सदरलँड नाबाद 48, लिचफिल्ड 32, गार्डनर नाबाद 5, अवांतर 6, श्री चरणी 2-41, क्रांती गौड व दीप्ती शर्मा प्रत्येकी 1 बळी).