ऑस्ट्रेलियाचा स्टोइनीस वनडे क्रिकेटमधून निवृत्त
वृत्तसंस्था/मेलबोर्न
ऑस्ट्रेलियन संघातील अष्टपैलू मार्कस स्टोइनीसने वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करुन क्रिकेट शौकिनांना अनपेक्षित धक्का दिला आहे. पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेसाठी घोषित करण्यात आलेल्या ऑस्ट्रेलियन संघामध्ये स्टोइनीसचा समावेश करण्यात आला होता. पण स्टोइनिसच्या या निर्णयामुळे निवड समितीला धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट निवड समितीसमोर संघाची निवड करताना दुखापतग्रस्त खेळाडूंची डोखेदुखी अधिक झाली आहे. मात्र 35 वर्षीय स्टोइनीस यापुढे क्रिकेटच्या टी-20 प्रकारासाठी खेळणार आहे. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी अंतिम संघ निवडीची मुदत 12 फेब्रुवारीपर्यंत असल्याने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला अद्याप स्टोइनीसच्या जागी दुसऱ्या खेळाडूची निवड करण्यासाठी पुरेसा अवधी आहे.
चॅम्पियन्स करंडक स्पर्धा पाक आणि दुबईमध्ये 19 फेब्रुवारीपासून सुरू होईल. द. आफ्रिकेत सुरू असलेल्या टी-20 स्पर्धेत खेळताना स्टोइनीसला ही दुखापत झाली होती. 10 वर्षांपूर्वी स्टोइनीसने ऑस्ट्रेलियाच्या वनडे संघामध्ये स्थान मिळविले आणि त्याने आपल्या कामगिरीत सातत्य राखले. 2018-19 च्या कालावधीत स्टोइनीसची ऑस्ट्रेलियातर्फे सर्वोत्तम वनडे क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली होती. त्याने 71 वनडे सामन्यात 1495 धावा जमविताना 1 शतक आणि 6 अर्धशतके नोंदविली. 2015 साली इंग्लंडविरुद्ध त्याने वनडे पदार्पण केले होते. 2021 च्या आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत तसेच 2023 च्या आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत जेतेपद मिळविणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघात स्टोइनीसचा समावेश होता.