ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर मालिका विजय
ट्रेव्हिस हेड ‘सामनावीर’ आणि ‘मालिकावीर’, इंग्लंड 49 धावांनी पराभूत
► वृत्तसंस्था / ब्रिस्टॉल
ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियाने येथे खेळविण्यात आलेल्या वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात यजमान इंग्लंडचा डकवर्थ लेव्हिस नियमाच्या आधारे 49 धावांनी पराभव केला. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांची ही वनडे मालिका 3-2 अशा फरकाने जिंकली. ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेडला ‘मालिकावीर’ आणि ‘सामनावीर’ असा दुहेरी पुरस्कार मिळाला.
या मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिले सलग दोन सामने जिंकल्यानंतर इंग्लंडने सलग दोन सामने जिंकून मालिकेत बरोबरी साधली असल्याने हा शेवटचा निर्णायक सामना दोन्ही संघाच्या दृष्टिने महत्त्वाचा होता. या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी दिली. इंग्लंडचा डाव 49.2 षटकात 309 धावांवर आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव सुरू असताना पावसाचा अडथळा आला. दरम्यान पंचांनी डकवर्थ लेव्हीस नियमाचा आधार घेतला. ऑस्ट्रेलियाने 20.4 षटकात 2 बाद 165 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर पावसामुळे खेळ थांबविण्यात आला. डकवर्थ लेव्हीस नियमाच्या आधारे ऑस्ट्रेलियाला 20.4 षटकात विजयासाठी 117 धावांची जरुरी होती. ऑस्ट्रेलियाने 2 बाद 165 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांनी हा सामना 49 धावांनी जिंकला. या सामन्यात इंग्लंडच्या डकेटचे शतक तसेच कर्णधार ब्रुकचे अर्धशतक वाया गेले.
इंग्लंडच्या डावामध्ये डकेटने 91 चेंडूत 2 षटकार आणि 13 चौकारांसह 107 तर कर्णधार ब्रुकने 52 चेंडूत 7 षटकार आणि 3 चौकारांसह 72 धावा जमविल्या. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 132 धावांची शतकी भागिदारी केली. आदिल रशीदने 35 चेंडूत 4 चौकारांसह 36 तर सॉल्टने 27 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांसह 45 धावा जमविताना डकेटसमवेत सलामीच्या गड्यासाठी 58 धावांची भागिदारी केली. इंग्लंडच्या डावामध्ये 12 षटकार आणि 25 चौकार नोंदविले गेले. ऑस्ट्रेलियातर्फे ट्रेव्हीस हेडने 28 धावांत 4 तर हार्डी आणि झांपा व मॅक्सवेल यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना शॉर्ट आणि हेड या सलामीच्या जोडीने 7.1 षटकात 78 धावांची भगिदारी केली. हेडने 26 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 31 धावा जमविल्या. हेड बाद झाल्यानंतर कर्णधार स्मिथ आणि शॉर्ट यांनी दुसऱ्या गड्यासाठी 40 धावांची भर घातली. शॉर्टने 30 चेंडूत 4 षटकार आणि 7 चौकारांसह 58 धावा जमविल्या. स्मिथ आणि इंग्लीस यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. स्मिथ 48 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 36 तर इंग्लीस 20 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 28 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावात 9 षटकार आणि 17 चौकार नोंदविले गेले. इंग्लंडतर्फे पॉटस् आणि कार्से यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक: इंग्लंड 49.3 षटकात सर्व बाद 309 (डकेट 107, ब्रुक 72, सॉल्ट 45, बेथेल 13, अदिल रशीद 36, अवांतर 6, हेड 4-28, हार्डी, झंपा, मॅक्स्वेल प्रत्येकी 2 बळी), ऑस्ट्रेलिया (विजयासाठी 20.4 षटकात 117 धावांचे उद्दिष्ट), 20.4 षटकात 2 बाद 165 (शॉर्ट 58, हेड 31, स्मिथ नाबाद 36, इंग्लीस नाबाद 28, अवांतर 12, पॉटस्, कार्से प्रत्येकी 1 बळी)