For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑस्ट्रेलियाचा भारतावर 5-1 ने दणदणीत विजय

06:00 AM Apr 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
ऑस्ट्रेलियाचा भारतावर 5 1 ने दणदणीत विजय
Advertisement

पाच सामन्यांच्या हॉकी मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताच्या पदरी निराशा

Advertisement

वृत्तसंस्था /पर्थ

पाच सामन्यांच्या हॉकी कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय पुरुष हॉकी संघाला ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभव स्वीकारावा लागला. शनिवारी ऑस्ट्रेलियातील पर्थ हॉकी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा 5-1 असा पराभव केला. ऑस्ट्रेलियाकडून टीम ब्रँड (तिसरे मिनिट), टॉम विकहॅम (20 आणि 38 वे मिनिट), जोएल रिंटाला (37 वे मिनिट) आणि फ्लिन ओगिलिव्ह (57 वे मिनिट) यांनी गोल केले, तर भारताकडून गुरजंत सिंगने 47 व्या मिनिटाला एकमेव गोल केला. दरम्यान, उभय संघातील दुसरा सामना पर्थ येथे दि. 7 एप्रिल रोजी होईल. सामन्याच्या सुरुवातीपासून आक्रमक खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाने संपूर्ण सामन्यावर वर्चस्व राखले. खेळाच्या तिसऱ्या मिनिटाला गोल नोंदवून ऑसी संघाने शानदार सुरुवात केली. टीम ब्रँडने ऑस्ट्रेलियन संघासाठी मैदानी गोल केला आणि संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर 10 व्या मिनिटाला मोहम्मद राहिलने भारतीय संघाला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळवून दिला. मात्र, त्याला गोल करण्यात अपयश आले.

Advertisement

दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघ पुनरागमन करण्याच्या इराद्याने मैदानात उतरला पण ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या भारतीय संघाला खाते उघडू दिले नाही. 20 व्या मिनिटाला टॉम विकहॅमने गोल करत ऑस्ट्रेलियन संघाला 2-0 असे आघाडीवर नेले. सामन्याच्या पूर्वार्धानंतर भारतीय संघ गोल करण्याचा सतत प्रयत्न करत होता, पण आक्रमक खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियासमोर त्यांची मात्रा चालली नाही. 37 व्या मिनिटाला जोएल रिंटालाने तर 38 व्या मिनिटाला विकहॅमने गोल केला व संघाची आघाडी 4-0 अशी केली. खेळाच्या शेवटच्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने यश संपादन केले. भारतीय खेळाडू गुरजंत सिंगने मैदानी गोलद्वारे संघाचे खाते उघडले आणि सामन्याच्या 47 व्या मिनिटाला गोल केला. मात्र, तोपर्यंत भारत या सामन्यात खूप मागे होता, तर ऑस्ट्रेलियाने आपले गोल वाढवत स्कोअर 5-1 ने केला आणि सामना एकतर्फी जिंकला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. दरम्यान, या सामन्यात भारतीय संघाकडून अनेक चुका झाल्या, याचा फटका टीम इंडियाला बसला. गुरजंत सिंग वगळता एकाही खेळाडूला गोल करता आला नाही. याउलट ऑसी संघाने शानदार खेळाचे प्रदर्शन साकारताना सामना एकतर्फी जिंकण्यात यश मिळवले.

Advertisement
Tags :

.