ऑस्ट्रेलियाचा भारतावर निसटता विजय
वृत्तसंस्था/ होबार्ट
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या प्रो-लीग पुरुषांच्या हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेतील रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात बलाढ्या ऑस्ट्रेलियाने भारताचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव केला. ऑस्ट्रेलियाने हा सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये 5-4 अशा गोलफरकाने जिंकला.
या सामन्यात दोन्ही संघांचा खेळ दर्जेदार झाला. निर्धारित वेळेत दोन्ही संघ 2-2 असे गोल बरोबरीत राहिले. त्यानंतर पंचांनी पेनल्टी शूटआऊटचा अवलंब केला. भारतातर्फे अमित रोहिदासने 15 व्या मिनिटाला तर जुगराज सिंगने 43 व्या मिनिटाला गोल नोंदवून भारताला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली होती. पण त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या जोएल रिंटालाने 47 व्या आणि 56 व्या मिनिटाला असे 2 गोल करुन आपल्या संघाला निर्धारित वेळेत बरोबरी साधून दिली. पेनल्टी शूटआऊटमध्ये दोन्ही संघांनी पहिल्या चार फटक्यांवर गोल नोंदविले. पण आदित्य अर्जुन लालगेचा पाचव्या फटक्यावरील गोल ऑस्ट्रेलियाचा गोलरक्षक स्नोडेनने अडविला. त्यामुळे भारताला हा सामना थोडक्यात गमवावा लागला. आता प्रो-लीग हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेतील होबार्ट टप्प्यातील भारताचा तिसरा सामना स्पेन बरोबर मंगळवारी होणार आहे. या स्पर्धेच्या राऊरकेला येथे झालेल्या टप्प्यामध्ये भारतीय हॉकी संघाने सलग पाच सामने गमाविले होते. तर होबार्ट टप्प्यातील पहिल्या सामन्यात स्पेनने भारतावर 2-0 अशी मात केली होती.
रविवारच्या सामन्यात पहिल्या 15 मिनिटांच्या कालावधीत भारतीय संघाचा खेळ अधिक आक्रमक आणि वेगवान झाला. 15 व्या मिनिटाला अमित रोहिदासने मैदानी गोल करुन भारताचे खाते उघडले. दुसऱ्या 15 मिनिटांच्या कालावधीत दोन्ही संघांना पेनल्टी कॉर्नरच्या संधी मिळाल्या पण त्याचा लाभ घेता आला नाही. या कालावधीत ऑस्ट्रेलियाने 2 पेनल्टी कॉर्नर्स वाया घालविले. खेळाच्या तिसऱ्या 15 मिनिटांच्या कालावधीत 2 गोल नोंदविले गेले. 43 व्या मिनिटाला जुगराज सिंगने पेनल्टी कॉर्नरवर भारताचा दुसरा गोल केला. 47 व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि रिंटालाने या संधीचा फायदा घेत आपल्या संघाचे खाते उघडले. सामना संपण्यास केवळ 4 मिनिटे बाकी असताना ऑस्ट्रेलियाला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. आणि रिंटालाने संघाचा आणि वैयक्तिक दुसरा गोल करुन निर्धारित वेळेत भारताशी 2-2 अशी बरोबरी साधली.