ऑस्ट्रेलियाचा वनडे क्रिकेटमधील सलग चौदावा विजय
इंग्लंडचा 68 धावांची पराभव, अॅलेक्स कॅरे सामनावीर
वृत्तसंस्था/ लीड्स
विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियाने वनडे क्रिकेटमध्ये आपला सलग 14 वा विजय नोंदविण्याचा पराक्रम केला. शनिवारी येथे झालेल्या 5 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या लढतीत ऑस्ट्रेलियाने यजमान इंग्लंडचा 68 धावांनी पराभव करत 2-0 अशी आघाडी मिळवली. या सामन्यात फलंदाजीत 74 धावा झळकाविणाऱ्या अॅलेक्स कॅरेला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी दिली. ऑस्ट्रेलियाचा डाव 44.4 षटकात 270 धावांत आटोपला. त्यानंतर इंग्लंडने 40.2 षटकात 202 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना पराभव पत्करावा लागला.
ऑस्ट्रेलियाच्या डावामध्ये कॅरेने 67 चेंडूत 3 षटकार आणि 8 चौकारांसह 74, कर्णधार मार्शने 59 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारांसह 60, शॉर्टने 36 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 29, हेडने 27 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 29, हार्डीने 25 चेंडूत 3 चौकारांसह 23 आणि लाबुशेनने 1 चौकारासह 19 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावात 10 षटकार आणि 28 चौकार नोंदविले गेले. इंग्लंडतर्फे कारसेने 75 धावांत 3 तर पॉट्स, आदिल रशिद आणि बेथेल यांनी प्रत्येकी 2 गडी व स्टोनने 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाच्या शिस्तबद्ध आणि अचूक गोलंदाजीसमोर इंग्लंडचा डाव 202 धावांत आटोपला. त्यांच्या एकाही फलंदाजाला अर्धशतक नोंदविता आले नाही. स्मिथने 98 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांसह 49, डकेटने 25 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 32, अदिल रशिदने 34 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 27, कारसेने 46 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 26, बेथेल 35 चेंडूत 4 चौकारांसह 25 आणि सॉल्टने 3 चौकारांसह 12 धावा झळकाविल्या. इंग्लंडच्या डावात 5 षटकार आणि 22 चौकार नोंदविले गेले. ऑस्ट्रेलियातर्फे स्टार्कने 3 तर हॅजलवूड, हार्डी आणि मॅक्सवेल यांनी प्रत्येकी 2 व झंपाने 1 गडी बाद केला. या मालिकेतील तिसरा सामना मंगळवार दि. 24 सप्टेंबर रोजी खेळविला जाईल. ऑस्ट्रेलियाचा संघ आता वनडे मानांकनात अग्रस्थान मिळविण्यासाठी झगडत आहे.
पुरुषांच्या वनडे क्रिकेट इतिहासामध्ये सलग सामने जिंकण्याचा हा दुसऱ्या क्रमांकाचा विक्रम आहे. यापूर्वी म्हणजे 2003 साली ऑस्ट्रेलियाने वनडे क्रिकेटमध्ये सलग 21 सामने जिंकण्याचा विश्वविक्रम नोंदविला होता. तर वनडे क्रिकेटमध्ये महिलांच्या विभागात ऑस्ट्रेलियाने 2018 आणि 2021 साली सलग 26 सामने जिंकण्याचा विश्वविक्रम केला असून तो अद्याप अबाधित आहे. भारतामध्ये चालू वर्षीच्या प्रारंभ झालेल्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील जेतेपदानंतर ऑस्ट्रेलियन संघाने सलग 14 वनडे सामने जिंकले आहेत. भारतात झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने पहिले 2 सामने गमाविल्यानंतर त्यांनी सलग 9 सामने जिंकून चषकावर आपले नाव कोरले. ऑस्ट्रेलियन संघाने सहाव्यांदा विश्वचषक स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. चालू वर्षीच्या क्रिकेट हंगामात ऑस्ट्रेलियाने मायदेशात विंडीजचा 3-0 असा व्हाईटवॉश केला. सध्या इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिले सलग 2 सामने जिंकले आहेत. या कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाने वनडे क्रिकेटमध्ये सलग 14 विजय नोंदविताना यापूर्वी लंकन संघाने 2023 साली नोंदविलेला सलग 13 सामन्यातील विजयाचा विक्रम मागे टाकला.
संक्षिप्त धावफलक - ऑस्ट्रेलिया 44.4 षटकात सर्व बाद 270 (कॅरे 74, मार्श 60, शॉर्ट 29, हेड 29, लाबुशेन 19, हार्डी 23, अवांतर 18, कारसे 3-75, पॉट्स, अदिल रशिद, बेथेल प्रत्येकी 2 बळी, स्टोन 1-46), इंग्लंड 40.2 षटकात सर्वबाद 202 (स्मिथ 49, डकेट 32, रशिद 27, कारसे 26, बेथेल 25, सॉल्ट 12, अवांतर 19, स्टार्क 3-50, हॅझलवूड, हार्डी, मॅक्सवेल प्रत्येकी 2 बळी, झंपा 1-42).