For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑस्ट्रेलियन महिला संघाचे सातवे विश्व विजेतेपद

06:58 AM Jul 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
ऑस्ट्रेलियन महिला संघाचे सातवे विश्व विजेतेपद
Advertisement

महिला टी-20 विश्वचषक स्पर्धा : इंग्लंडचा 7 गड्यांनी पराभव, बेथ मुनी ‘मालिकावीर, सामनावीर’

Advertisement

वृत्तसंस्था / लंडन

2026 च्या आयसीसी महिलांच्या विश्व चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत रविवारी खेळविण्यात आलेल्या लॉर्डस मैदानावरील सामन्यात बलाढ्या ऑस्ट्रेलियाने यजमान इंग्लंडचा 17 चेंडू बाकी ठेवून 7 गड्यांनी दणदणीत पराभव करत विक्रमी सातव्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले. स्पर्धेत 238 धावा जमविणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनीला मालिकावीर आणि सामनावीर असा दुहेरी पुरस्कार मिळाला. सातवेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या ऑस्ट्रेलियाला सुमारे 22 कोटी रुपये मिळाले. याव्यतिरिक्त, उपविजेत्या इंग्लंडला 11 कोटी रुपये बक्षिसाची रक्कम मिळाली आहे.

Advertisement

ऑस्ट्रेलियाच्या डावाला व्हॉल आणि मुनी यांनी सावध सुरूवात करून देताना 11 चेंडूत 17 धावा जमविल्या. दुसऱ्या षटकातील पाचव्या चेंडूवर बेलने व्हॉलचा त्रिफळा उडविला. तिने 6 चेंडूत दोन चौकारांसह 9 धावा जमविल्या.

शतकी भागीदारी

मुनी आणि लिचफिल्ड या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 67 चेंडूत शतकी भागीदारी नोंदवून आपल्या संघाला सहजपणे विजय मिळवून दिला. मुनीने 49 चेंडूत 10 चौकारांसह 64 तर लिचफिल्डने 35 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांसह 48 धावा झोडपल्या. 13 व्या षटकात लिचफिल्ड डिनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाली. त्यानंतर बेथ मुनी इक्लेस्टोनच्या गोलंदाजीवर पायचीत झाली. ऑस्ट्रेलियाने यावेळी 16 षटकात 3 बाद 140 धावा जमविल्या होत्या. पेरी आणि गार्डनर यानी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. पेरीने 12 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 13, तर गार्डनरने नाबाद 3 धावा जमविल्या. इंग्लंडतर्फे बेल, इक्लेस्टोन आणि डिन यानी प्रत्येकी 1 गडी बाद केला. ऑस्ट्रेलियाच्या डावात 2 षटकार आणि 20 चौकार नोंदविले गेले. ऑस्ट्रेलियाने पॉवरप्ले दरम्यानच्या पहिल्या 6 षटकात 62 धावा जमविताना 1 गडी गमविला. मुनीने 38 चेंडूत 7 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. 14 षटकात ऑस्ट्रेलियाने 2 बाद 129 धावा जमविल्या होत्या.

या स्पर्धेमध्ये बेथ मुनीने फलंदाजीत सातत्य राखत 238 धावा जमविल्याने तिला मालिकावीराचा बहुमान मिळाला. तर अंतिम सामन्यात तिने 64 धावा झोडपल्याने तिला सामनावीर पुरस्कारही देण्यात आला. रविवारचा हा अंतिम सामना एकतर्फी झाल्याने रंगत पहावयास मिळाली नाही. लॉर्ड्सच्या मैदानावर ऑस्ट्रेलियन महिलांनी आपले वर्चस्व सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत कायम राखले.

तत्पूर्वी, सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी दिली. डावातील दुसऱ्या षटकात सलामीची जोन्स झेलबाद झाली. हॅमिल्टनने तिला व्हॉल करवी झेलबाद केले. जोन्सने 1 चौकारासह 6 धावा केल्या. सदरलँडने डॅनी वेट हॉजला 5 षटकातील पाचव्या चेंडूवर मुनीकरवी झेलबाद केले. तिने 1 चौकारासह 8 धावा जमविल्या.

कर्णधार नॅट सिव्हर ब्रंट आणि अॅलिस कॅप्से या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 35 धावांची भर घातली. मॉलीन्युक्सने कॅप्सेचा त्रिफळा उडविला. तिने 20 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 23 धावा जमविल्या. गार्थने नाईटला 2 धावावर पायचीत केले. इंग्लंडची स्थिती यावेळी 10.5 षटकात 4 बाद 70 अशी होती.

कर्णधार ब्रंट आणि केंप या जोडीने 5 गड्यासाठी अभेद्य 80 धावांची भागीदारी 55 चेंडूत केली. ब्रंटने 53 चेंडूत 5 चौकारांसह नाबाद 58 तर केंपने 28 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 44 धावा जमविल्याने इंग्लंडला 150 धावापर्यंत मजल मारता आली. इंग्लंडच्या डावामध्ये 2 षटकार आणि 13 चौकार नोंदविले गेले. इंग्लंडने पॉवरप्ले दरम्यानच्या पहिल्या 6 षटकात 39 धावा जमविताना 2 गडी गमविले. ब्रंटने 45 चेंडूत 5 चौकारांसह अर्धशतक झळकविले. ऑस्ट्रेलियातर्फे गार्थ, हॅमिल्टन, मॉलिन्युक्स आणि सदरलॅन्ड यानी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक : इंग्लंड 20 षटकात 4 बाद 150 (नॅट सिव्हर ब्रंट नाबाद 58, केंप नाबाद 44, कॅप्से 23, जोन्स 6, हॉज 8, नाईट 2, अवांतर 9 गार्थ, हॅमिल्टन, मॉलिन्युक्स, सदरलँड प्रत्येकी 1 बळी). ऑस्ट्रेलिया 17.1 षटकात 3 बाद 153 (बेथ मुनी 64, लिचफिल्ड 48, पेरी नाबाद 13, गार्डनर नाबाद 3, व्हॉल्व 9, अवांतर 16, डिन, बेल, इक्लेस्टोन प्रत्येकी 1 बळी).

Advertisement
Tags :

.