For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑस्ट्रेलियन महिला आठव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश

06:45 AM Jul 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
ऑस्ट्रेलियन महिला आठव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश
Advertisement

विंडीज महिलांचा 8 गड्यांनी दणदणीत पराभव, बेथ मुनीचे नाबाद अर्धशतक, सामनावीर अॅश्ले गार्डनरची अष्टपैलू चमक

Advertisement

वृत्तसंस्था, ओव्हल

2026 च्या आयसीसी टी-20 महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बलाढ्या  ऑस्ट्रेलियन संघाने मंगळवारच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात विंडीजचा 42 चेंडू बाकी ठेवून 8 गड्यांनी दणदणीत पराभव करत आठव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनीने नाबाद अर्धशतक (61) धावा झळकविल्या.

Advertisement

आतापर्यंत पाचवेळा या स्पर्धेचे विजेतेपद मिळविणारा ऑस्ट्रेलियन महिला संघ आता सहाव्या जेतेपदाच्या समीप पोहोचला आहे. या स्पर्धेतील दुसरा उपांत्य फेरीचा सामना इंग्लंड आणि द. आफ्रिका यांच्यात गुरुवारी खेळविला जणार असून अंतिम सामना रविवार दि. 5 जुलै रोजी होणार आहे.

मंगळवारच्या पहिल्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून विंडीजला प्रथम फलंदाजी दिली. विंडीजने 20 षटकांत 7 बाद 125 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 13 षटकांत 2 गड्यांच्या मोबदल्यात 127 धावा जमवित हा सामना एकतर्फी जिंकला.

विंडीजच्या डावात कर्णधार मॅथ्युजने 28 चेंडूत 5 चौकारांसह 30, कॅम्पबेलने 25 चेंडूत 3 चौकारांसह 22, जोसेफने 22 चेंडूत 1 षटकारासह 16, हेन्रीने 1 चौकारासह 10, ग्लास्गोने 1 चौकारासह 15 आणि डॉटिनने 16 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 26 धावा जमविल्या. विंडीजच्या डावात 1 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले. ऑस्ट्रेलियातर्फे मॉलीन्युक्स, गार्डनर आणि वेअरहॅम यांनी प्रत्येकी 2 तर सदरलँडने 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाच्या डावात सलामीच्या जॉर्जिया व्हॉलने 11 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 16 धावा जमविताना बेथ मुनी समवेत सलामीच्या गड्यासाठी 18 चेंडूत 29 धावांची भर घातली. हेन्रीने व्हॉलला त्रिफळाचीत केले. मॅथ्युजने लिचफिल्डला केवळ 4 धावांवर पायचीत केले. एलीस पेरीला दुखापत झाल्याने ती 2 धावांवर असताना निवृत्त झाली. ऑस्ट्रेलियाने यावेळी 2 बाद 64 धावा जमविल्या होत्या.

बेथ मुनी आणि गार्डनर या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी अभेद्य 63 धावांची भागिदारी करत आपल्या संघाला मोठा विजय मिळवून दिला. मुनीने 36 चेंडूत 8 चौकारांसह नाबाद 61 तर गार्डनरने 20 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 35 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावात 2 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले. ऑस्ट्रेलियाने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकांत 63 धावा जमविताना 2 गडी गमविले. मुनीने 29 चेंडूत 7 चौकारांसह अर्धशतक झळकविले. विंडीजतर्फे हेन्री आणि मॅथ्युज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक : विंडीज 20 षटकांत 7 बाद 125 (मॅथ्युज 30, कॅम्पबेल 22, जोसेफ 16, ग्लास्गो 15, हेन्री 10, डॉटीन नाबाद 26, मॉलिन्युक्स, गार्डनर, वेअरहॅम प्रत्येकी 2 बळी, सदरलँड 1-26), ऑस्ट्रेलिया 13 षटकांत 2 बाद 127 (बेथ मुनी नाबाद 61, गार्डनर नाबाद 35, व्हॉल 16, पेरी निवृत्त 2, लिचफिल्ड 4, अवांतर 9, हेन्री व मॅथ्युज प्रत्येकी 1 बळी).

Advertisement
Tags :

.