ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक-फलंदाज मॅथ्यू वेड निवृत्त
आता सांभाळणार प्रशिक्षणाची जबाबदारी
वृत्तसंस्था/ मेलबर्न
2021 मधील टी-20 विश्वचषक विजेत्या संघाचा भाग राहिलेला यष्टीरक्षक-फलंदाज मॅथ्यू वेड मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असून आता ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठीच्या संघांचा प्रशिक्षक म्हणून तो काम करण्यास सुऊवात करेल.
वेड पाकिस्तानविऊद्धच्या आगामी टी-20 मालिकेसाठी आंद्रे बोरोवेकच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाच्या कोचिंग स्टाफमध्ये सामील होईल आणि पुढील आठवड्यात मेलबर्न येथे सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी देखील हा टास्मानियाचा खेळाडू या गटाबरोबर असेल.
हा 36 वर्षीय खेळाड 13 वर्षांच्या कारकिर्दीत 36 कसोटी, 97 एकदिवसीय आणि 92 टी-20 सामने खेळला आणि राष्ट्रीय संघात त्याचा शेवटचा सहभाग या वर्षीच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये राहिला. तथापि, वेड किमान पुढील दोन हंगामांत टास्मानियातर्फे देशांतर्गत क्रिकेट खेळेल आणि बिग बॅश लीगमध्ये होबार्ट हरिकेन्सतर्फे उतरेल.
‘माझी आंतरराष्ट्रीय कारकीर्द ही बहुदा संपल्यात जमा आहे याची मला पूर्ण जाणीव गेल्या टी-20 विश्वचषकाच्या शेवटी झाली होती. गेल्या सहा महिन्यांपासून माझी आंतरराष्ट्रीय निवृत्ती आणि प्रशिक्षण देण्याविषयी जॉर्ज (बेली) आणि अँड्य्रू (मॅकडोनाल्ड) यांच्याशी सतत चर्चा चालली होती, असे वेडने क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
‘गेल्या काही वर्षांपासून प्रशिक्षकाची भूमिका माझ्या मनात होती आणि काही उत्तम संधी माझ्या वाट्याला आल्या आहेत, ज्याबद्दल मी खूप कृतज्ञ आणि उत्साहित आह’, असे वेड पुढे म्हणाला. या डावखुऱ्या फलंदाजाने आपल्या संपूर्ण कारकिर्दीत दिलेल्या पाठिंब्याबद्दल क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत.