ऑस्ट्रेलियाचे टेनिसपटू स्टोले कालवश
मेलबोर्न : ऑस्ट्रेलियन टेनिस क्षेत्रातील महान टेनिसपटू म्हणून ख्याती मिळविणारे फ्रेड स्टोले यांचे गुरुवारी येथे वयाच्या 86 व्या वर्षी वृद्धापकालाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. ऑस्ट्रेलियन टेनिस क्षेत्रामध्ये फ्रेड स्टोले यांची कामगिरी अविस्मरणीय असून त्यांनी आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेत एकेरीची दोन अजिंक्यपदे तसेच एटीपी टूरवरील प्रमुख स्पर्धातील 17 दुहेरीतील अजिंक्यपदे मिळविली आहेत. टेनिस क्षेत्रातून निवृत्त झाल्यानंतर टेनिस समालोचक क्षेत्रात प्रवेश केला. 1960 च्या दशकामध्ये ऑस्ट्रेलियन टेनिस क्षेत्रामध्ये फ्रेड स्टोले यांनी पाच ग्रॅन्डस्लॅम स्पर्धांमध्ये एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. 1960 च्या दशकामध्ये टेनिस क्षेत्र हौशी कक्षेतुन व्यावसायिक क्षेत्रात प्रवेश केला. फ्रेड स्टोले यांना टेनिस क्षेत्रामध्ये फेरी फ्रेड या टोपण नावाने ओळखले जात असे. 1966 साली अमेरिकन टेनिस स्पर्धेत स्टोले यांनी ऑस्ट्रलियाच्या जॉन न्युकोंबचा अंतिम सामन्यात पराभव करुन विजेतेपद पटकाविले होते.