ऑस्ट्रेलिया महिला फुटबॉल संघ विजयी
वृत्तसंस्था, पथुम थानी (थायलंड)
एएफसी 20 वर्षांखालील वयोगटातील महिलांच्या आशिया चषक फुटबॉल स्पर्धेतील येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय महिला फुटबॉल संघाचा 5-0 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला. या स्पर्धेतील भारतीय महिला फुटबॉल संघाचा हा दुसरा सलग पराभव आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या स्केई हॅल्मारिकने शानदार हॅट्ट्रीक नोंदवून आपल्या संघाला सुस्थितीत नेले. ऑस्ट्रेलियाने मध्यंतरापर्यंत भारतावर 2-0 अशी आघाडी मिळविली होती. ऑस्ट्रेलियाच्या हॅल्मारिकने 38 व्या, 39 व्या आणि 48 व्या मिनिटाला असे तीन गोल नोंदवून हॅट्ट्रीक साधली. सामन्यातील उत्तरार्धात म्हणजे खेळाच्या 54 व्या मिनिटाला डेनिला ब्रुटसने तर डेझी ब्राऊनने 94 व्या मिनिटाला गोल नोंदविले. या सामन्यामध्ये भारतीय संघावर सुरूवातीपासून शेवटपर्यंत ऑस्ट्रेलियाने दडपण राखल्याने भारतीय खेळाडूंना आपले खाते उघडता आले नाही. मात्र भारताने किमान चारवेळा ऑस्ट्रेलियन गोलपोस्टपर्यंत मुसंडी मारली. पण त्यांना त्याचे गोलात रुपांतर करता आले नाही. आता या स्पर्धेत क गटात भारतीय संघ शेवटच्या स्थानावर आहे. या गटातील भारताचा शेवटचा सामना चीन तैपेईबरोबर बुधवारी खेळविला जाईल.
सामना सुरू झाल्यानंतर पहिल्या सुमारे 37 मिनिटांच्या कालावधीत भारतीय संघाने आक्रमक आणि वेगवान खेळावर अधिक भर दिल्याने ऑस्ट्रेलियाला आपले खाते उघडता आले नाही. पण ऑस्ट्रेलियन संघातील हॅल्मारिकने 38 व्या मिनिटाला आपल्या संघाचे खाते उघडले. त्यानंतर पुन्हा केवळ 1 मिनिटांच्या कालावधीत तिने ऑस्ट्रेलियाचा आणि वैयक्तिक दुसरा गोल केला. सामन्याच्या उत्तरार्धाला प्रारंभ झाल्यानंतर 48 व्या मिनिटाला तिने संघाचा आणि वैयक्तिक तिसरा गोल करुन हॅट्ट्रीक साधली. ब्रुटसने 54 व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाची आघाडी वाढविली. निर्धारीत 90 मिनिटांच्या कालावधीत ऑस्ट्रेलियाने भारतावर चार गोल नोंदविले होते. दुखापतग्रस्त कालावधी चार मिनिटांचा ऑस्ट्रेलियाला देण्यात आला आणि 94 व्या मिनिटाला ब्राऊनने ऑस्ट्रेलियाचा पाचवा आणि शेवटचा गोल हेडरद्वारे करुन भारताचे आव्हान एकतर्फी संपुष्टात आणले.