For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मॅक्सवेलच्या संस्मरणीय द्विशतकाने ऑस्ट्रेलिया विजयी

06:58 AM Nov 08, 2023 IST | Tarun Bharat Portal
मॅक्सवेलच्या संस्मरणीय द्विशतकाने ऑस्ट्रेलिया विजयी
Advertisement

वादळी खेळी करीत नोंदवले  वर्ल्ड कपमधील दुसरे द्विशतक, 3 गड्यांनी विजय मिळवित ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

मंगळवारी जगभरातील क्रिकेटरसिकांना विश्वचषकातील एक संस्मरणीय व झुंजार द्विशतक पहावयास मिळाले. सामनावीराचा मानकरी ठरलेल्या ग्लेन मॅक्सवेलने नोंदवलेल्या वादळी नाबाद द्विशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 19 चेंडूत बाकी ठेवत अफगाणचा 3 गड्यांनी पराभव करून उपांत्य फेरी गाठली.

Advertisement

292 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची स्थिती 7 बाद 91 अशी झाली, तेव्हा अफगाण आणखी एका विश्वविजेत्या संघाला धक्का देणार, हे निश्चित वाटत होते. पण मॅक्सवेलने आठव्या गड्यासाठी कर्णधार कमिन्ससमवेत नाबाद 202 धावांची झुंजार व तुफानी भागीदारी करीत संघाला एकहाती विजय मिळवून दिला. दोन जीवदानाचा लाभ घेत त्याने केवळ 128 चेंडूत 21 चौकार व 10 षटकारांची आतषबाजी करीत वैयक्तिक व विश्वचषकातील दुसरे द्विशतक नोंदवले. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत कोणत्याही खेळाडूने नोंदवलेले हे पहिलेच द्विशतक आहे. त्याला क्रँपचा त्रास होऊ लागल्याने त्या वेदनांवर मात करीत त्याने झुंजार फलंदाजी केली. त्याची ही खेळी दीर्घकाळ क्रिकेटरसिकांच्या स्मरणात राहील, हे निश्चित आहे. त्याला साथ देणारा कमिन्स 12 धावांवर नाबाद राहिले. त्याने 68 चेंडू किल्ला लढतीत मॅक्सवेलला उत्कृष्ट साथ दिली आणि ऑस्ट्रेलियातर्फे आठव्या गड्यासाठी अभेद्य 202 धावांची सर्वोच्च भागीदारी नोंदवली. त्यांनी शेन वॉर्न व पॉल रॅफेल यांनी नोंदवलेला 119 धावांचा विक्रम मागे टाकला.

या स्पर्धेत जायंट किलर ठरलेल्या अफगाणने भेदक गोलंदाजी करीत विजयाच्या दिशेने आगेकूच केली होती. पण मॅक्सवेलने झुंजार खेळी करीत अक्षरश: त्यांच्या घशातील विजयाचा घास खेचून काढला. नूर अहमदने त्याला दिलेले सोपे जीवदान अफगाणला खूप खूप महाग पडले. पराभवामुळे इब्राहिम झद्रनने नोंदवलेले पहिले वर्ल्ड कप शतक आणि रशिद खानची अष्टपैलू खेळीही वाया गेली. अफगाणच्या नवीन उल हक, अझमतुल्लाह, रशिद खान यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले. पण नंतर ते मॅक्सवेलच्या फटकेबाजीसमोर पूर्णत: निष्प्रभ ठरले. अफगाणचा शेवटचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तर ऑस्ट्रेलियाचा सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे.

झद्रन अफगाणचा पहिला शतकवीर

इब्राहिम झद्रनच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या ऐतिहासिक शतकाच्या जोरावर मंगळवारी वानखेडे स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात अफगाणने बलाढ्या ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 292 धावांचे आव्हान दिले आहे. 21 वर्षीय इब्राहिम झद्रनने 143 चेंडूत 3 षटकार आणि 8 चौकारांसह नाबाद 129 धावांची खेळी केली. विश्वचषक स्पर्धेत अफगाणतर्फे नोंदवलेले हे पहिलेच शतक आहे.

या सामन्यात अफगाणचा कर्णधार शाहीदीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वानखेडेच्या खेळपटीवर ऑस्ट्रेलियन गोलंदाजानी बऱ्यापैकी गोलंदाजी करत अफगाणला फटकेबाजीपासून पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच्या 10 षटकात रोखले होते. अफगाणने पहिल्या 10 षटकात 46 धावा जमविताना 1 गडी गमविला होता. गुरबाज आणि झद्रन या जोडीने 8 षटकात 38 धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाच्या हॅझलवुडने गुरबाजला स्टार्ककरवी जेलबाद केले. त्याने 25 चेंडूत 2 चौकारांसह 21 धावा जमविल्या.

झद्रन आणि रेहमत शहा या जोडीने एकेरी आणि दुहेरी धावावर अधिक भर देत धावफलक हलता ठेवला. या जोडीने 16.4 षटकात 83 धावांची भागीदारी दुसऱ्या गड्यासाठी केली. अफगाणचे पहिले अर्धशतक 63 चेंडूत तर शतक 122 चेंडूत फलकावर लागले. झद्रन आणि शहा यानी 59 चेंडूत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. झद्रनने 62 चेंडूत 4 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. 25 व्या षटकात मॅक्सवेलने त्याला झेलबाद केले. त्याने 44 चेंडूत 1 षटकारासह 30 धावा जमविल्या. कर्णधार शाहीदीने झद्रनसमवेत तिसऱ्या गड्यासाठी 52 धावांची भर घातली. शाहीदीने 43 चेंडूत 2 चौकारांसह 26 धावा केल्या. स्टार्कने शाहीदीचा त्रिफळा उडविला. अफगाणचे दीडशतक 185 चेंडूत नोंदविले गेले.

शाहीदी बाद झाल्यानंतर झद्रनला ओमरझाई, नबी आणि रशिद खान यानी चांगली साथ दिल्याने अफगाणला 291 धावापर्यंत मजल मारता आली. झद्रन आणि ओमरझाई यानी चौथ्या गड्यासाठी 33 धावांची भागीदारी केली. फिरकी गोलंदाज झॅम्पाने ओमरझाईला झेलबाद केले. त्याने 18 चेंडूत 2 षटकार आणि 1 षटकारासह 22 धावा जमविल्या. डावातील 43 व्या षटकात ओमरझाई बाद झाल्यानंतर नबीने 10 चेंडूत 1 षटकारासह 12 धावा जमविताना झद्रनसमवेत पाचव्या गड्यासाठी 20 धावांची भर घातली.

अफगाणने दुसऱ्या पॉवरप्ले दरम्यान 149 धावांची भर घालताना 2 गडी गमविले. अफगाणचे द्विशतक 245 चेंडूत फलकावर लागले. झद्रनने 131 चेंडूत 7 चौकारांसह शतक पूर्ण केले. अष्टपैलू रशिद खानने शेवटच्या काही षटकामध्ये आक्रमक फटकेबाजी केली. रशिद खानने झद्रनसमवेत 6 गड्यासाठी अभेद्य 58 धावांची भागीदारी केली. रशिद खानने 18 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 35 धावा झळकविल्या. तर झद्रनने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून 3 षटकार आणि 8 चौकारांसह नाबाद 129 धावांची खेळी केली. रशिद खान आणि झद्रन या जोडीने अर्धशतकी भागीदारी 25 चेंडूत नोंदविली. अफगाणच्या 250 धावा 282 चेंडूत नेंदविल्या गेल्या. ऑस्ट्रेलियातर्फे हॅझलवुडने 39 धावात 2 तर स्टार्क, मॅक्सवेल आणि झॅम्पा यानी प्रत्येकी 1 गडी बाद केला. अफगाणतर्फे या सामन्यात 9 षटकार आणि 16 चौकार नोंदविले गेले. अफगाणच्या फलंदाजानी शेवटच्या 5 षटकात 64 धावा झोडपल्या.

संक्षिप्त धावफलक : अफगाण : 50 षटकात 5 बाद 291 (इब्राहीम झद्रन 143 चेंडूत 3 षटकार, 8 चौकारांसह नाबाद 129, गुरबाज 2 चौकारासह 21, रेहमत शहा 1 चौकारासह 30, शाहीदी 2 चौकारांसह 26, ओमरझाई 2 षटकार आणि 1 चौकारासह 18 चेंडूत 22, रशिद खान 18 चेंडूत 3 षटकार, 2 चौकारांसह नाबाद 35, नबी 1 षटकारासह 12, अवांतर 16, हॅझलवुड 2-39, स्टार्क 1-

70, मॅक्सवेल 1-55, झॅम्पा 1-58).

ऑस्ट्रेलिया 46.5 षटकांत 7 बाद 293 : वॉर्नर 18, हेड 0, मार्श 11 चेंडूत 2 चौकार, 2 षटकारांसह 24, लाबुशेन 14, इंग्लिस 0, मॅक्सवेल 128 चेंडूत 21 चौकार, 10 षटकारांसह नाबाद 201, स्टोइनिस 6, स्टार्क 2, कमिन्स 68 चेंडूत नाबाद 12, अवांतर 15. नवीन उल हक 2-47, अझमतुल्लाह 2-52, रशिद खान 2-44.

सचिनकडून प्रोत्साहन : झद्रन

या सामन्यात 21 वर्षीय इब्राहीम झद्रनने शानदार नाबाद शतक झळकविले. हा सामना सुरू होण्यापूर्वी भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आपल्याला महत्वाचा कानमंत्र दिल्याने आपण ही खेळी करू शकलो, अशी प्रतिक्रिया झद्रनने व्यक्त केली आहे. 4 वर्षापूर्वी इब्राहीम झद्रनने वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत 26 वनडे सामन्यात 5 शतके 5 अर्धशतके नोंदविली आहेत. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अफगाणतर्फे शतक नोंदविणारा इब्राहीम झद्रन हा पहिला फलंदाज ठरला आहे. तसेच ऑस्ट्रेलियाविरूध्द शतक नेंदविणारा अफगाणचा तो पहिला फंलदाज आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासामध्ये अफगाणतर्फे सर्वोच्च धावसंख्या नोंदविण्याचा पराक्रम झद्रनने केला आहे. 2015 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत ड्युनेडीन येथे झालेल्या स्कॉटलंडविरूध्दच्या सामन्यात अफगाणच्या समीउल्ला शेनवारीने 96 धावा नेंदविण्याचा विक्रम केला होता. आता झद्रनने हा विक्रम मागे टाकला आहे.

Advertisement
Tags :

.