ऑस्ट्रेलियाचा विंडीजवर 11 धावांनी विजय
पहिल्या टी 20 सामन्यात कांगारुंची बाजी : सामनावीर वॉर्नरची 70 धावांची खेळी
वृत्तसंस्था/ होबार्ट
सामनावीर डेव्हिड वॉर्नरची शानदार अर्धशतकी खेळी व अॅडम झम्पा, मार्क स्टोनिसच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या टी 20 सामन्यात विंडीजवर 11 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना कांगारुंनी 20 षटकांत 7 बाद 213 धावा केल्या. विजयी आव्हानाचा पाठलाग करताना विंडीज संघाला 202 धावापर्यंत मजल मारता आली. या विजयासह ऑसी संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 आघाडी घेतली आहे. उभय संघातील दुसरा सामना दि. 11 रोजी अॅडलेड येथे होईल.
ऑस्ट्रेलियन संघाने वनडे मालिकेत एकतर्फी यश मिळवल्यानंतर पहिल्या टी 20 सामन्यातही धडाकेबाज खेळ साकारला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नर व जोस इंग्लिश यांनी 93 धावांची सलामी दिली. वॉर्नरने नेहमीप्रमाणे आक्रमक खेळताना 36 चेंडूत 70 धावा फटकावल्या. इंग्लिशनेही त्याला चांगली साथ देताना 39 धावांचे योगदान दिले. ही जोडी बाद झाल्यानंतर कर्णधार मिचेल स्टार्क (16) व ग्लेन मॅक्सवेल (10), मार्क स्टोनिस (9) यांनी निराशा केली. यानंतर टीम डेव्हिडने मात्र 17 चेंडूत नाबाद 37 धावा करत संघला दोनशेचा टप्पा गाठून दिला. मॅथ्यू वेडने 21 धावा केल्या. ऑसी संघाने 20 षटकांत 7 बाद 213 धावा केल्या.
विजयासाठीच्या 214 धावांचा पाठलाग करताना विंडीज संघाने देखील आक्रमक सुरुवात केली. ब्रेडॉन किंग व जॉन्सन चार्ल्स जोडीने 89 धावांची सलामी दिली. ब्रेडॉनने 53 तर चार्ल्सने 42 धावा केल्या. ही जोडी बाद झाल्यानंतर ठराविक अंतराने विंडीजच्या विकेट्स गेल्या. अनुभवी निकोल्स पूरन (18), रोव्हमन पॉवेल (14), शाय होप (16), आंद्रे रसेल (1) हे स्वस्तात बाद झाले. यानंतर जेसॉन होल्डरने 15 चेंडूत नाबाद 34 धावांचे योगदान दिले. विंडीज संघाला 20 षटकांत 8 बाद 202 धावापर्यंतच मजल मारता आली. यामुळे त्यांना 11 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया 20 षटकांत 7 बाद 213 (डेव्हिड वॉर्नर 70, इंग्लिश 39, टीम डेव्हिड नाबाद 37, मॅथ्यू वेड 21, आंद्रे रसेल 3 तर अल्झारी जोसेफ 2 बळी).
वेस्ट इंडिज 20 षटकांत 8 बाद 202 (ब्रेडॉन किंग 53, चार्ल्स 42, जेसॉन होल्डर नाबाद 34, अॅडम झम्पा 3 तर मार्क स्टोनिस 2 बळी).
100 व्या टी 20 सामन्यात वॉर्नरचा असाही विक्रम
डेव्हिड वॉर्नने कसोटी आणि वनडे फॉरमॅटमधील आपल्या 100 व्या सामन्याप्रमाणे हाही सामना आठवणी राहण्यासारखा खेळून काढला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये 100 टी 20 सामने खेळणारे याआधी फक्त दोन खेळाडू होते. विराट कोहली आणि रॉस टेलर यांच्यानंतर आता डेव्हिड वॉर्नर शुक्रवारी या यादीत जोडला गेला. विशेष म्हणजे, कसोटी, वनडे आणि आता टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 सामन्यांचा टप्पा पार करणारा वॉर्नर पहिलाच ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला.