ऑस्ट्रेलियात विषप्रयोग झाला होता : जोकोविचचा खळबळजनक दावा
वृत्तसंस्था/ मेलबर्न
सर्बियन टेनिस आयकॉन नोव्हाक जोकोविचने कोविड-19 लस न घेतल्याबद्दल त्या वर्षीच्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या आधी ऑस्ट्रेलियातून हद्दपार केले जाण्यापूर्वी मेलबर्नमधील आपल्या वास्तव्यादरम्यान आपल्यावर ‘शिसे’ आणि ‘पारा’ यांचा वापर करून विषप्रयोग झाल्याचा धक्कादायक दावा केला आहे.
जोकोविच विक्रमी 11 वे ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपद आणि विक्रमी 25 वे ग्रँडस्लॅम जेतेपद मिळविण्यासाठी सध्या सज्ज झाला आहे. पुऊष आणि महिला गटांमध्ये कोणत्याही खेळाडूने इतकी ग्रँडस्लॅम जेतेपदे मिळविलेली नाहीत. त्याशिवाय एटीपी टूर स्तरावरील विजेतेपदांचे शतक साध्य करण्याचे लक्ष्यही त्याच्यासमोर आहे.
ऑस्ट्रेलियाला रवाना होणाऱ्या जोकोविचच्या जीवनात त्या भूमीवरील मैदानातील अनेक आनंददायी क्षण आहेत. पण त्याचबरोबर त्याच्या आयुष्यातील सर्वांत काळा अध्यायही तिथेच उलगडला होता. जोकोविचने कोविड-19 ची लस घेण्यास नकार दिला होता आणि आपल्या शरीरात काय घेऊ व काय घेऊ नये याचे स्वातंत्र्य आपल्याला असल्याचे मत त्याने उघडपणे व्यक्त केले होते. पण महामारीच्या काळात ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा होण्यापूर्वी जोकोविचला प्रथम मेलबर्नच्या हॉटेलमध्ये ताब्यात घेण्यात आले आणि नंतर त्याला लस न घेतल्याच्या कारणास्तव हद्दपार करण्यात आले. त्यामुळे त्यावेळी तो या स्पर्धेत सहभागी होऊ शकला नाही
जोकोविचने आता उघड केले की, जेव्हा तो सर्बियाला परतला तेव्हा त्याला त्याच्या शरीरात ‘जड धातू’ आणि पारा’ यांची उच्चस्तरीय उपस्थिती जाणवली. ‘मला आरोग्याच्या काही समस्या भेडसावू लागल्या होत्या आणि मला समजले की, मेलबर्नमधील त्या हॉटेलमध्ये मला विषारी अन्न दिले गेले होते’, असा दावा त्याने केला आहे. ‘मी जेव्हा सर्बियाला परत आलो तेव्हा मला काही गोष्टींचा पत्ता लागला. मी हे कधीच कोणाला जाहीरपणे सांगितले नाही, पण मला असे आढळले की, माझ्यामध्ये जड धातूचे प्रमाण खरोखरच जास्त आहे. माझ्यामध्ये शिसे आणि पारा यांचे प्रमाण खूप जास्त होते’, असे जोकोविचने पुढे सागितले.
जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर राहिलेल्या या खेळाडूने असेही सांगितले की, त्याला मेलबर्न येथे ‘जेल रूम’मध्ये ठेवण्यात आले होते. हे स्पर्धेपूर्वी कठोर विलगीकरणाला सामोरे जावे लागणाऱ्या इतर अॅथलीट्सच्या विपरित होते.