पाक दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ जाहीर
वृत्तसंस्था / मेलबोर्न
पाक क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर वनडे मालिका खेळण्यासाठी येणार आहे. ही मालिका नोव्हेंबरमध्ये होणार आहे. या मालिकेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शनिवारी संघाची घोषणा केली असून पॅट कमिन्सकडे कर्णधारपद सोपविले आहे. दरम्यान या मालिकेसाठी पाक संघाची घोषणा पुढील आठवड्यात केली जाणार आहे.
अलिकडेच पाक निवड समितीने बाबर आझमला संघातून डच्चु दिल्याने त्याच्या जागी आता मोहम्मद रिझवानचे नाव पाक क्रिकेट वर्तुळामध्ये घेतले जाते. पाक निवड समिती समोर या मालिकेसाठी मोहम्मद रिझवानला पहिली पसंती राहिल, अशी अपेक्षा आहे. दरम्यान पीसीबीचे चेअरमन मोहसीन नकवी निवड समिती सदस्यांशी चर्चा करुनच अंतिम निर्णय घेतील. या मालिकेसाठी मोहम्मद हेसनेनला संधी मिळेल, असा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या जानेवारीमध्ये त्याने न्यूझीलंड संघाविरुद्ध पाकचे प्रतिनिधीत्व केले होते. अष्टपैलु अमिर जमाल आणि यष्टीरक्षक व फलंदाज हसीबुल्ला यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
ऑस्ट्रेलिया आणि पाक यांच्यातील वनडे मालिकेला 4 नोव्हेंबरपासून मेलबोर्न येथे प्रारंभ होणार आहे. या मालिकेतील दुसरा सामना 8 नोव्हेंबरला अॅडलेड ओव्हल येथे तर तिसरा सामना 10 नोव्हेंबरला ऑप्टस् स्टेडियममध्ये खेळविला जाईल. या वनडे मालिकेनंतर उभय संघात तीन सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे. सदर मालिकेतील सामने 14, 16, 18 नोव्हेंबरला होतील. त्याच प्रमाणे पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील तिसरी आणि शेवटची कसोटी 24 ऑक्टोबरपासून रावळपिंडीत होणार आहे.
वनडे मालिकेसाठी 14 सदस्यांचा ऑस्ट्रेलियन संघ जाहीर केला असून पॅट कमिन्सच्या संघामध्ये ट्रेव्हिस हेड, मिचेल मार्श आणि कॅमेरुन ग्रीन यांचा समावेश नाही. काही वैयक्तिक कौटुंबिक समस्यांमुळे मार्श आणि हेड या मालिकेसाठी उपलब्ध राहू शकणार नाहीत. तर पाठदुखापतीवर शस्त्रक्रिया करुन घेण्याचे ठरविल्याने ग्रीन या मालिकेत खेळु शकणार नाहीत. इंग्लीसकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी राहिल. अॅलेक्स कॅरेला मात्र निवड समितीने वगळले आहे.
ऑस्ट्रेलिया संघ: पॅट कमिन्स (कर्णधार), अॅबॉट, कोनोली, प्रेझर-मॅकगर्क, हार्डी, हॅजलवूड, इंग्लीस, लाबुसेन, मॅक्सवेल, शॉर्ट, स्टिव्ह स्मिथ, स्टार्क, स्टोईनस आणि झंपा.