ऑस्ट्रेलिया मास्टर्स 137 धावांनी विजयी
शेन वॅटसनचे दमदार शतक, द.आफ्रिका मास्टर्स पराभूत
वृत्तसंस्था / बडोदा
2025 च्या इंटरनॅशनल मास्टर्स लीग वयस्करांच्या क्रिकेट स्पर्धेत येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात शेन वॅटसनच्या दमदार शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलिया मास्टर्स संघाने द. आफ्रिका मास्टर्स संघावर 137 धावांनी मोठा विजय मिळविला. या स्पर्धेतील वॅटसनचे हे विक्रमी तिसरे शतक आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया मास्टर्सने 20 षटकात 1 बाद 260 धावा झोडपल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना द. आफ्रिका मास्टर्स संघाने 123 धावांपर्यंत मजल मारली. द. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी दिली. वॅटसन आणि फर्ग्युसन यांनी केवळ 15 षटकात 186 धावांची शतकी भागिदारी केली. बेन डंकने 74 धावांचे योगदान दिल्याने ऑस्ट्रेलिया मास्टर्स संघाला 260 धावांपर्यंत मजल मारता आली. वॅटसनने आपल्या खेळीमध्ये 9 षटकार आणि 9 चौकारांसह 61 चेंडूत नाबाद 122 धावा झळकविल्या. द. आफ्रिकेतर्फे पिटर्सनने 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना द. आफ्रिका मास्टर्सचा डाव 123 धावांत आटोपला. हाशीम अमलाने 30 तर पिटर्सनने 28 धावा केल्या. ऑस्ट्रेलियन्स मास्टर्स संघातर्फे बेन लॉगलीनने 18 धावांत 3 गडी बाद केले. डुहेर्टी आणि मॅक गेन यांनी प्रत्येकी 2 तसेच नाथन नाईल आणि रेरडॉन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. संक्षिप्त धावफलक: ऑस्ट्रेलिया मास्टर्स 20 षटकात 1 बाद 260 (वॅटसन नाबाद 122, फर्ग्युसन 85, डंक 74, पिटर्सन 1-54), द. आफ्रिका मास्टर्स सर्वबाद 123 (हाशीम आमला 30, ए. पिटर्सन 28, लॉग लीन 3-18, डुहेर्टी आणि मॅकगेन प्रत्येकी 2 बळी)