ऑस्ट्रेलिया, भारत, द.आफ्रिका, ब्रिटन लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी पात्र
वृत्तसंस्था, लॉस एंजेलिस
2028 साली होणाऱ्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक स्पर्धेत महिलांच्या टी-20 क्रिकेट स्पर्धेचा समावेश आहे. दरम्यान या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया, भारत, द. आफ्रिका आणि ब्रिटनच्या महिला संघांनी आपले तिकीट आरक्षित केले आहे.
आयसीसी महिलांच्या सध्या सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील विविध संघांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला. ऑस्ट्रेलिया, भारत, द. आफ्रिका आणि ग्रेट ब्रिटन महिला संघांनी अनुक्रमे ओसेनिया, आशिया, आफ्रिका आणि युरोप विभागातून पात्रता स्पर्धेत अव्वल स्थान मिळविल्याने हे संघ लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. 2028 च्या लॉस एन्जिल्स ऑलिम्पिक स्पर्धेत महिलांची टी-20 क्रिकेट स्पर्धेत एकूण 6 संघांचा समावेश असून त्यापैकी 4 संघ सध्या पात्र ठरले आहेत. पाचव्या स्थानासाठी अमेरिकेचा संघ पात्रता स्पर्धेत खेळणार आहे. ही पात्रता स्पर्धा 30 जून ते 31 डिसेंबर दरम्यान घेतली जाणार आहे. तर सहावा संघ टी-20 ताज्या मानांकनानंतर निश्चित केला जाईल.