रोमांचक विजयानंतर ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत
उपांत्य लढतीत पाकवर एका गड्याने मात, सामनावीर स्ट्रेकरचे 6 बळी, हॅरी डिक्सनचे अर्धशतक, अझान अवैस-अराफत मिन्हासची अर्धशतके वाया
वृत्तसंस्था /बेनोनी (द. आफ्रिका)
अतिशय रोमांचक ठरलेल्या लोस्कोरिंग उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तान युवा संघाचा केवळ एका गड्याने पराभव करून यू-19 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळविले. 24 धावांत 6 बळी मिळविणाऱ्या टॉम स्ट्रेकरला सामनावीराचा बहुमान मिळाला. रविवारी भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. 48.5 षटकांत पाकचा डाव गुंडाळल्यानंतर ऑस्ट्रेलियाने 5 बाद 146 पर्यंत मजल मारली होती. पण यानंतर पाकने झटपट बळी मिळवित त्यांची स्थिती 9 बाद 164 अशी केली, त्यावेळी पाक हा सामना जिंकणार असेच वाटत होते. पण रॅफ मॅकमिलनने विडलरच्या साथीने शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर चौकार मारत विजय साकार केला. मॅकमिलन 19 धावांवर नाबाद राहिला. त्याआधी सलामीवीर हॅरी डिक्सन (50) व ऑलिव्हर पीके (49), टॉम कॅम्पबेल (25) यांनी उपयुक्त योगदान देत ऑस्ट्रेलियाच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. याशिवाय सॅम कॉन्स्टासने 14 धावा केल्या तर अवांतराच्या 10 धावा मिळाल्या. पाकच्या अली रझाने भेदक मारा करीत चार बळी मिळवित त्यांच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण केले होते. पण कांगारू निसटता विजय मिळविण्यात अखेर यशस्वी ठरले. अली रझाने 34 धावांत 4 बळी मिळविले तर अराफत मिन्हासने 2, उबेद शहा व नावीद अहमद खान यांनी एकेक बळी टिपले.
स्ट्रेकरचा भेदक मारा
पाकने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 180 धावांचे आव्हान दिले होते. ऑस्ट्रेलियाच्या स्ट्रेकरने 24 धावात 6 गडी बाद केले. तर पाकच्या अझान अवैस आणि अराफत मिन्हास यांनी अर्धशतके झळकवली. या स्पर्धेत भारतीय युवा संघाने यजमान द. आफ्रिकेचा पराभव करत यापूर्वीच अंतिम फेरी गाठली आहे. या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पाकला प्रथम फलंदाजी दिली. ऑस्ट्रेलियाच्या शिस्तबद्ध आणि भेदक गोलंदाजीसमोर पाकचा डाव 48.5 षटकात 179 धावांत आटोपला. अझान अवैस आणि अराफत मिन्हास यांनी अर्धशतके झळकवल्याने पाकला 150 धावांचा टप्पा ओलांडता आला. अझान अवैसने 91 चेंडूत 3 चौकारांसह 52 तर अराफत मिन्हासने 61 चेंडूत 9 चौकारांसह 52 धावा जमवल्या. सलामीच्या शमी हुसेनने 3 चौकारांसह 17 धावा जमवल्या. पाकच्या उर्वरित फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. पाकला अवांतराच्या रुपात 20 धावा मिळाल्या. पाकने पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच्या 10 षटकात 27 धावा जमवताना दोन गडी गमवले. पाकचे पहिले अर्धशतक 102 चेंडूत तर शतक 199 चेंडूत फलकावर लागले. अझान अवैस आणि मिन्हास यांनी सहाव्या गड्यासाठी 54 धावांची भागीदारी केली. पाकला शेवटच्या 10 षटकात 47 धावा जमवता आल्या आणि त्यांनी 5 गडी गमवले. पाकच्या डावात 17 चौकार नोंदवले गेले. ऑस्ट्रेलियातर्फे टॉम स्ट्रेकर सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 24 धावात 6 तर बर्डमन, विडलेर, मॅकमिलन आणि कॅम्पबेल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : पाक यू-19 संघ 48.5 षटकात सर्वबाद 179 (अझान अवैस 52, अराफत मिन्हास 52, शमी हुसेन 17, अवांतर 20, स्ट्रेकर 6-24, बर्डमन, विडलेर, मॅकमिलन, कॅम्पबेल प्रत्येकी एक बळी).
ऑस्ट्रेलिया यू-19 संघ 49.1 षटकांत 9 बाद 181 : हॅरी डिक्सन 75 चेंडूत 50, कॉन्स्टास 14, ऑलिव्हर पीके 75 चेंडूत 49, कॅम्पबेल 42 चेंडूत 25, मॅकमिलन 29 चेंडूत नाबाद 19, अवांतर 10, अली रझा 4-34, अराफत मिन्हास 2-20.