For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अॅशेसमध्ये ऑस्ट्रेलियाचा बोलबाला, मालिकेत 4-1 ने सरशी

10:43 AM Jan 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
अॅशेसमध्ये ऑस्ट्रेलियाचा बोलबाला  मालिकेत 4 1 ने सरशी
Advertisement

शेवटच्या कसोटीतही कांगारुंचा 5 गड्यांनी विजय : इंग्लंडचा मालिकेत सुपडासाफ : टॅव्हिस हेड सामनावीर तर मिचेल स्टार्क मालिकावीर

Advertisement

वृत्तसंस्था/सिडनी

येथील सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळल्या गेलेल्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला 5 गडी राखून पराभूत करत मालिका 4-1 ने जिंकली. इंग्लंडने दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियासमोर 160 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे यजमान संघाने पाचव्या दिवशी टी ब्रेकपूर्वीच गाठले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत आपले अव्वलस्थान आणखी मजबूत केले आहे. मिचेल स्टार्क व ट्रॅव्हिस हेड हे दोघे ऑस्ट्रेलियाच्या मालिका विजयाचे हिरो ठरले. मिचेल स्टार्कने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजी विभागाची धुरा सांभाळत उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने या मालिकेत सर्वाधिक 31 विकेट्स घेतल्या, यासह तो मालिकावीरही ठरला. याशिवाय, पाचव्या सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या हेडला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. सर्वाधिक सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्त्व केलेल्या स्टीव्ह स्मिथने ट्रॉफी स्वीकारत ती पॅट कमिन्सच्या हातात दिली आणि दोघांनी ट्रॉफी उंचावत मालिका विजय साजरा केला.

Advertisement

सिडनीतही कांगारुंचे वर्चस्व

प्रारंभी, सिडनीत खेळवल्या गेलेल्या या कसोटीत प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 384 धावा केल्या. पहिल्या डावात इंग्लंडकडून जो रूटने सर्वाधिक 160 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेड व स्टीव्ह स्मिथ यांनी पहिल्या डावात दोन शतके झळकावली. हेडच्या 163 व स्मिथच्या 138 धावांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने 567 धावा केल्या आणि 183 धावांची आघाडी मिळवली. यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना इंग्लंडकडून 22 वर्षीय जेकब बेथेलने पहिले शतक झळकावत 154 धावा केल्या.

उस्मान ख्वाजाचा कसोटीला अलविदा

सिडनी येथे खेळवला गेलेला पाचवा कसोटी सामना ऑस्ट्रेलियन सलामीवीर उस्मान ख्वाजाच्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना होता. दुसऱ्या डावात फक्त 6 धावा करून तो बाद झाला. ख्वाजा बाद होताच सिडनी क्रिकेट ग्राउंडवर उपस्थित प्रेक्षक उभे राहून टाळ्या वाजवून त्याचा सन्मान केला. यावेळी स्टँडमध्ये उपस्थित त्याचे कुटुंब भावूक दिसले. पॅव्हेलियनमध्ये परतत असतानाचा उस्मान ख्वाजाने मैदानावर सजदा केला, ज्यामुळे हा क्षण आणखी अविस्मरणीय बनला.

ऑस्ट्रेलियाचे अव्वलस्थान भक्कम

अॅशेस मालिकेतील अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 5 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह, कांगारू संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत आपले अव्वलस्थान मजबूत केले आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या साखळीत ऑस्ट्रेलियाचा हा आठ सामन्यातील सातवा विजय आहे. सध्याच्या घडीला ऑसी संघाची विजयाची टक्केवारी 87.50 इतकी आहे. या विजयासह त्यांनी फायनलमधील आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या स्थानी असून द.आफ्रिका तिसऱ्या, श्रीलंका चौथ्या तर पाकिस्तान पाचव्या स्थानावर आहे. दुसरीकडे, टीम इंडिया मात्र टॉप-5 मधून बाहेर पडली आहे. भारतीय संघ 48.15 टक्केवारीसह सहाव्या स्थानावर आहे.

संक्षिप्त धावफलक

इंग्लंड पहिला डाव 384 आणि दुसरा डाव 342,ऑस्ट्रेलिया पहिला डाव 567 आणि 31.2 षटकांत 5 बाद 161 (ट्रॅव्हिस हेड 29, वेदरलँड 34, लाबुशेन 37, स्मिथ 12, उस्मान ख्वाजा 6, कॅरी नाबाद 16, ग्रीन नाबाद 22, जोश टंग 3 बळी, विल जॅक्स 1 बळी).

Advertisement
Tags :

.