महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

तिसऱ्या टी-20 लढतीत ऑस्ट्रेलियाची न्यूझीलंडवर 27 धावांनी मात

06:55 AM Feb 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ ऑकलंड, न्यूझीलंड

Advertisement

रविवारी अतिवृष्टीने प्रभावित झालेल्या तिसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने डकवर्थ-लुईस पद्धतीनुसार न्यूझीलंडचा 27 धावांनी पराभव करून मालिका 3-0 अशा फरकाने एकतर्फी जिंकली आणि या वर्षी होणार असलेल्या टी-20 विश्वचषकाचे दावेदार या नात्याने त्यांना मिळणारी पसंती आणखी मजबूत केली. 11 चेंडूत 27 धावा व एक बळी मिळविणाऱ्या मॅथ्यू शॉर्टला सामनावीर तर 98 धावा आणि 2 बळी टिपणाऱ्या मिचेल मार्शला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला.

Advertisement

न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने त्याच्या 100 व्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात नाणेफेक जिंकली आणि पावसाचा धोका लक्षात घेऊन ऑस्ट्रेलियाला फलंदाजीस पाठविले. ऑस्ट्रेलियाच्या डावात तीन वेळा पावसाचा व्यत्यय आला आणि शेवटी 4 बाद 118 अशा स्थितीत असताना 10.4 षटकांनंतर त्यांचा डाव संपुष्टात आला. डकवर्थ-लुईस प्रणालीच्या अंतर्गत न्यूझीलंडसमोर 10 षटकांत विजयासाठी 126 धावांचे लक्ष्य उभे राहिले होते.

पण न्यूझीलंडला लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या जागतिक दर्जाच्या माऱ्यासमोर विजय मिळवता आला नाही. 10 षटकांच्या डावासाठी सुधारित नियमांनुसार ऑस्ट्रेलियाला तीन षटकांच्या ‘पॉवर प्ले’सह प्रत्येकी दोन षटके टाकू शकतील अशा पाच गोलंदाजांना परवानगी देण्यात आली होती. युवा डावखुरा गोलंदाज स्पेन्सर जॉन्सनने या वर्षाच्या सुऊवातीला झालेल्या आयपीएल लिलावात 1.4 दशलक्ष डॉलर्सना त्याला का करारबद्ध करण्यात आले हे दाखवून देताना दोन षटकांत 10 धावा देऊन 1 बळी घेतला. नॅथन एलिसने आपल्या दोन षटकांत केवळ 11, तर मिचेल स्टार्कने केवळ 15 धावा दिल्या आणि अॅडम झाम्पाने 20 धावा देऊन एक बळी घेतला.

एलिसने पाचव्या षटकात न्यूझीलंडचा सर्वांत मोठा हिटर ग्लेन फिलिप्सला चार निर्धाव चेंडू टाकले. डावाच्या मध्यास न्यूझीलंडची 2 बाद 51 अशी स्थिती झाली आणि शेवटच्या 30 चेंडूंमध्ये 75 धावा काढण्याचे आव्हान त्यांच्यासमोर उभे राहिले. एलिसने नवव्या षटकात केवळ 8 धावा दिल्यानंतर न्यूझीलंडला विजयासाठी शेवटच्या षटकात 43 धावांची गरज होती. ऑस्ट्रेलियाच्या डावात 11 चेंडूंत 27 धावा काढलेल्या मॅट शॉर्टने टाकलेल्या या शेवटच्या षटकात पहिल्या चेंडूवर षटकार खेचण्यात आला. पण पुढच्या तीन चेंडूंवर एकेरी धावा, तर पाचव्या चेंडूवर दोनच धावा काढता आल्या आणि शेवटच्या चेंडूवर चौकार फटकावण्यात आला. अशा प्रकारे न्यूझीलंड लक्ष्य गाठण्यात कमी पडला.

मिच मार्शकडून कर्णधारपदाची धुरा स्वीकारलेल्या यष्टिरक्षक मॅथ्यू वेडने अवघड परिस्थितीत उत्तम रणनीती वापरत ऑस्ट्रेलियाचे चांगल्या प्रकारे नेतृत्व केले. तत्पूर्वी शॉर्टसमवेत ट्रॅव्हिस हेड (30 चेंडूंत 33 धावा) आणि ग्लेन मॅक्सवेल (20 धावा) यांच्या योगदानामुळे सहा षटकांचा पॉवर प्ले संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 2 बाद 67 अशी मजल मारली होती.

ऑस्ट्रेलिया 10.4 षटकांत 4 बाद 118 : हेड 33, शॉर्ट 11 चेंडूत 27, मॅक्सवेल 9 चेंडूत 20, इंग्लिस 8 चेंडूत नाबाद 14, क्लार्कसन 1-8. न्यूझीलंड 10 षटकांत 3 बाद 98 : फिलिप्स 24 चेंडूत नाबाद 40, जॉन्सन 1-10, शॉर्ट 1-33.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article