For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कसोटीत ऑस्ट्रेलिया पुन्हा अग्रस्थानावर

06:13 AM May 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
कसोटीत ऑस्ट्रेलिया पुन्हा अग्रस्थानावर
Advertisement

आयसीसी क्रमवारी : वनडे व टी-20 क्रमवारीत भारत अव्वल स्थानी

Advertisement

वृत्तसंस्था/ दुबई

आयसीसीने शुक्रवारी जाहीर केलेल्या ताज्या मानांकनात मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताने आपले अग्रस्थान कायम राखले आहे तर कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाने पहिले स्थान पुन्हा हस्तगत केले आहे. भारताने मागे टाकत त्यांनी पहिले स्थान मिळविले आहे.

Advertisement

आयसीसीने मानांकन अपडेट केल्यामुळे भारताला अग्रस्थानावरून दुसऱ्या स्थानावर यावे लागले. 2020-21 मोसमातील निकाल काढून टाकल्यामुळे ही भारताची ही घसरण झाली आहे. मे 2021 पासून पूर्ण झालेल्या मालिका विचारात घेण्यात आल्या आहेत. भारत (120) ऑस्ट्रेलियापेक्षा (124) फक्त चार गुणांनी मागे आहे तर तिसऱ्या स्थानावरील इंग्लंडपेक्षा 15 गुणांनी पुढे आहे. इंग्लंडचे 103 गुण झाले आहेत.

भारताने 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 2-1 अशी जिंकली होती. पण हा निकाल आता काढून टाकल्यामुळे भारताचे मानांकन घसरले आहे. तीन ते नऊ क्रमांकावरील संघांची स्थिती मात्र कायम आहे. अफगाण व आयर्लंड  या संघांनी पुरेशा कसोटी खेळलेल्या नसल्यामुळे केवळ नऊ संघांनाच मानांकन देण्यात आले आहे. याशिवाय झिम्बाब्वेने गेल्या तीन वर्षांत केवळ 3 कसोटी खेळल्या असल्यामुळे तेही या क्रमवारीतून बाहेर फेकले गेले आहेत. मानांकनात विचार होण्यासाठी प्रत्येक संघाने तीन वर्षाच्या कालावधीत किमान आठ कसोटी खेळणे आवश्यक आहे.

अपडेटनंतर भारताने वनडे व टी-20 संघांच्या क्रमवारीत मात्र अग्रस्थान कायम राखले आहे. मे 2023 आधी झालेल्या सामन्यांचा पन्नास टक्के तर त्यानंतरच्या सामन्यांचे निकाल शंभर टक्के विचारात घेतले गेले आहेत. भारताने वनडे वर्ल्ड कप अंतिम सामना गमविला असला तरी त्यांच्यावरील गुणांची आघाडी तीनवरून सहावर नेली आहे. भारताचे 122 गुण झाले आहेत. टॉप टेन क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही. मात्र आयर्लंडने झिम्बाब्वेला मागे टाकत अकरावे स्थान मिळविले आहे. तिसऱ्या स्थानावरील दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरुद्धचे अंतर आठवरून चार गुणांनी कमी केले आहे तर लंकन संघ पाचव्या स्थानावरील इंग्लंडपेक्षा केवळ दोन गुणांनी मागे आहे.

टी-20 क्रमवारीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला मागे टाकत दुसरे स्थान मिळविले आहे. मात्र ते भारतापेक्षा 7 गुणांनी मागे आहेत. अग्रस्थानावरील भारताचे 264 रेटिंग गुण झाले आहेत. दक्षिण आफ्रिका इंग्लंडपेक्षा दोन गुणांनी मागे असून त्यांनी सहाव्या स्थानावरून दोन स्थानांची प्रगती केली आहे. न्यूझीलंडचे 250 गुण असून द.आफ्रिकेचेही तितकेच गुण आहेत. मात्र दशांश गुणांच्या आधारे न्यूझीलंड त्यांच्यापेक्षा मागे आहे. विंडीज 249 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. तिसऱ्या स्थानावरील इंग्लंड व सहाव्या स्थानावरील विंडीज यांच्यात केवळ 3 गुणांचा फरक आहे. पाक संघाची दोन स्थानांनी घसरण झाली असून ते सातव्या स्थानावर आहेत तर स्कॉटलंडने झिम्बाब्वेला मागे टाकत 12 वे स्थान मिळविले आहे.

Advertisement
Tags :

.