For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नागपंचमी-श्रावण सोमवारचा सुयोग

06:38 AM Aug 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
नागपंचमी श्रावण सोमवारचा सुयोग
Advertisement

त. भा. प्रतिनिधी / बेळगाव

Advertisement

नागपंचमी आणि श्रावण सोमवार हा सुयोग जुळून आल्याने शहर परिसरातील नागमंदिरे आणि महादेवाची मंदिरे भाविकांच्या गर्दीने फुलून गेली. भारतीय संस्कृतीमध्ये माती आणि मनुष्याच्या जीवनासाठी पोषक ठरणाऱ्या प्राणी, पक्ष्यांची पूजा करून त्यांच्याप्रति आदर व्यक्त करण्याची परंपरा आहे. उंदीर आणि अन्य कीटक खाऊन नाग शेतकऱ्याला मदत करतो. यासाठी त्याची पूजा केली जाते.

पौराणिक कथांनुसार भगवान शिवाच्या गळ्यामध्ये वासुकी नाग असून भगवान विष्णूसुद्धा शेषनागावर पहुडले आहेत. त्यामुळे नागाची पूजा म्हणजे या देवतांची पूजा, असाही संदर्भ या पूजेसाठी आहे. याशिवाय ज्योतिष शास्त्र, पुराण यावर ज्यांची श्रद्धा आहे ते नागपूजनाने कालसर्प दोष कमी किंवा नाहीसा होतो, असे म्हणतात. त्यामुळेही नागाची पूजा केली जाते. आपले वडील (परीक्षित) यांच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी राजा जनमेजयाने सर्प कुळांचा नाश व्हावा म्हणून सर्पयज्ञ केला. मात्र सर्प कुळे नष्ट झाली तर शेतकरी अडचणीत येईल हे लक्षात घेऊन आस्तिक ऋषींनी हा यज्ञ थांबवून सर्प कुळांचे प्राण वाचविले. तेव्हापासून नागपूजा केली जाते, अशीही कथा आहे.

Advertisement

प्रथेनुसार रविवारी नाग चौथी झाली. बहुसंख्य ठिकाणी अळूच्या पानांवरून नाग आणले जातात. त्यामुळे बाजारात अळूची आवक वाढली होती. काही घरांमध्ये पहिल्या दिवशी एक, दुसऱ्या दिवशी दोन नाग प्रतिमा आणून त्यांची पूजा केली जाते. पंचमी दिवशी नागप्रतिमांची नऊ प्रकारच्या पत्री (पाने) घालून पूजा करण्यात आली. दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखविण्यात आला.  कपिलेश्वर मंदिरामध्ये अत्यंत पुरातन अशा नागमूर्ती आहेत. त्यांची पूजा करण्यासाठी महिलांनी एकच गर्दी केली होती. याशिवाय गोवावेस येथील नागमंदिरामध्येही गर्दी झाली होती.

श्रावणातील पंचमीचा सण हा खरे तर माहेरवाशिणींचा व महिलांचा मानला जातो. त्यामुळे मुली माहेरी आल्या की त्यांच्या हातात बांगड्या भरून त्यांना फराळ आणि भेटवस्तू दिली जाते. त्यामुळे कासारांच्या दुकानांमध्ये महिलांची गर्दी दिसून आली. शुभचिन्ह म्हणून महिला हातावर मेंदी रेखाटत असल्याने मेंदीच्या कोनांचीही विक्री झाली. शहरात जागेअभावी शक्य नसले तरी खेडोपाडी झोपाळे बांधून पंचमीची गाणी म्हणण्याचा आनंद महिलांनी लुटला.

Advertisement
Tags :

.