ऑरियनप्रो बुद्धिबळ स्पर्धा 16 जूनपासून मुंबईत
वृत्तसंस्था/मुंबई
इंडियन चेस स्कूलतर्फे वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये 16 ते 24 जून दरम्यान होणाऱ्या ऑरियनप्रो आंतरराष्ट्रीय ग्रॅन्डमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत विविध देशांतील आघाडीचे 34 बुद्धिबळपटू सहभागी होणार आहेत. यामध्ये 19 ग्रॅन्डमास्टर्स, 11 इंटरनॅशनल मास्टर्स, 4 महिला इंटरनॅशनल मास्टर्स यांचा समावेश आहे. तब्बल पाच वर्षांनंतर ही स्पर्धा पुन्हा भरविली जात असून एकूण बक्षिसाची रक्कम 40 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
ही स्पर्धा विविध गटांमध्ये घेतली जाईल. वरिष्ठ गटामध्ये भारताचा ग्रॅन्डमास्टर दीपतेन घोषला टॉपसिडींग देण्यात आले आहे. या गटामध्ये घोषला जॉर्जियाचा द्विवतीय मानांकीत ग्रॅन्डमास्टर लिव्हेन पेन्टसुलीया तसेच अर्मेनियाच्या तृतिय मानांकित ग्रॅन्डमास्टर प्रेट्रोसियान मॅन्युअल यांचा कडवा प्रतिकार राहील. यापुर्वी झालेल्या या स्पर्धांमध्ये अनेक कनिष्ठ गटातील बुद्धिबळपटू विजेते ठरले. आता तेच विजेते बुद्धिबळपटू फिडेच्या जागतिक बुद्धिबळ क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करीत असून त्यामध्ये विद्यमान विश्वविजेता भारतीय ग्रॅन्डमास्टर डी. गुकेशचा समावेश आहे.
16 जूनपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत ग्रॅन्डमास्टर विभागात आघाडीच्या पहिल्या तीन विजेत्या बुद्धिबळपटूंना अनुक्रमे 4, 3, 2 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल तर अनिष्ट गटातील पहिल्या तीन विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे 3, 2, 1 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल.या स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय खुली ग्रॅन्डमास्टर्स अशा वेगळ्या विभागात सामने खेळविले जातील.