आंग सान सू की तुरुंगातून नजरकैदेत
लष्करी सरकारकडून आता शिक्षेतही कपात
वृत्तसंस्था/ नायप्यीदॉ
म्यानमारच्या माजी नेत्या, आंग सान सू की यांना आता तुरुंगातून नजरकैदेत हलवण्यात आले आहे. तेथील लष्करी सरकारने जाहीर केलेल्या शिक्षा कपात आणि सार्वत्रिक माफीचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला. सरकारने शुक्रवारी जारी केलेल्या एका निवेदनात सू की आता त्यांच्या शिक्षेचा उर्वरित कालावधी एका निश्चित निवासस्थानी पूर्ण करतील, असे अध्यक्ष मिन आंग ह्लाइंग यांनी जाहीर पेले. सरकारी माध्यमांनी लाकडी बाकावर बसलेला त्यांचा एक फोटोही जारी केला असून तो अनेक वर्षांनंतरचा त्यांचा पहिला सार्वजनिक फोटो आहे. 2022 मध्ये विविध प्रकरणांमध्ये सू की यांना एकूण 33 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. अलीकडील शिक्षेतील सवलतीमुळे, त्यांची शिक्षा अंदाजे 18 वर्षांपर्यंत कमी झाली आहे. अजूनही 13 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा शिल्लक आहे. संयुक्त राष्ट्रांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, राजकीय प्रक्रियेला पुढे नेण्याच्या दिशेने हे एक सकारात्मक पाऊल असल्याचे म्हटले आहे. 2021 मध्ये झालेल्या लष्करी उठावानंतर आंग सान सू की यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या अटकेपासून म्यानमारमध्ये सतत हिंसाचार आणि अस्थिरता असून, त्यात अनेक लोकांचा बळीही गेला आहे.