For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

औंध उपसा सिंचन पाणी योजनेला मिळणार गती !

03:27 PM Jan 10, 2025 IST | Radhika Patil
औंध उपसा सिंचन पाणी योजनेला मिळणार गती
Advertisement

औंध : 

Advertisement

औंधसह 21 गावांच्या पाणी योजनेच्या कामाला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी ग्रीन सिग्नल दिला असून योजना त्वरित मार्गी लावण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

बुधवारी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे तसेच खात्याचे सचिव, अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत औंध उपसा सिंचन योजना, आंधळी योजनेच्या (जिहे कठापुर) उर्वरित कामे, विस्तारीत जिहे कठापूर योजनेची कामे सुरु करण्याबाबत उरमोडी थेटपाईपलाईनचे काम व सुप्रमा, नियोजित सोळशी धरण इ. कामाबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी माजी आ. डॉ. दिलीप येळगावकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, माजी पंचायत समिती सदस्य डॉ. विवेक देशमुख, शेती पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष संतोष मांडवे, उपाध्यक्ष धनाजी आमले, सचिन सूर्यवंशी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Advertisement

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून व मंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्यामुळे औंध सिंचन योजनेला चार दिवसांपूर्वी राज्यपालांची मान्यता मिळाली होती. मान्यतेचा सगळ्यात महत्वाचा टप्पा पार पडल्यानंतर बुधवारी दि. 8 रोजी लगेचच जलसंपदा मंत्री व ग्रामविकास मंत्री यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यामध्ये योजनेची सद्यस्थिती, गावे, सुप्रमा यावर चर्चा करण्यात आली. यामध्ये योजनेत प्रशासकीय पातळीवर असणाऱ्या सर्व अडचणी दूर करून तातडीने मार्गी लावण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.

आंधळी उपसा सिंचन योजना, जिहे-कठापूर योजनेला निधी उपलब्ध करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. तर उरमोडी व कण्हेरच्या आवर्तनसाठी एकच कॅनॉल असल्याने सांगली व सातारा जिह्याला आवर्तन सोडण्यात विविध अडचणी येत असून जवळपास दोन टी. एम. सी पाणी वाया जात असल्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले. त्यामुळे उरमोडी धरणापासून थेट पाईपलाईन करण्याबाबत व सुप्रमा घेण्याचा प्रस्ताव विचारात घेण्यात आला. यावेळी अधिकाऱ्यांना याबाबत योग्य त्या सूचना देण्यात आल्या.

  • माण-खटावला दुष्काळमुक्त करायचे आहे

माझ्या मतदारसंघातील दुष्काळी कलंक तीन वर्षात मला पुसायचा आहे, या योजना ताकतीने पूर्ण करणार आहे. मला माझ्या मतदारसंघाला दुष्काळमुक्त करण्याचा माझा अजेंडा आहे.

                                                                          जयकुमार गोरेग्रामविकास व पंचायतराज मंत्री

Advertisement
Tags :

.