पद्मभूषण उषा उथुप यांच्या सुरांनी रसिक मंत्रमुग्ध
नाशिकमध्ये लोकमान्य सोसायटीतर्फे कार्यक्रमाचे आयोजन : सुला विनयार्ड्सच्या निसर्गरम्य वातावरणात भव्य सोहळा संपन्न
प्रतिनिधी/ नाशिक
नाशिकची ओळख असलेल्या सुला विनयार्ड्सच्या खुल्या प्रांगणात रविवार दि. 11 जानेवारी रोजी एक अविस्मरणीय सांगीतिक पर्वणी नाशिककरांना अनुभवायला मिळाली. निमित्त होते लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्यावतीने आयोजित ‘उषा उथुप लाईव्ह इन कॉन्सर्ट’ या भव्य कार्यक्रमाचे.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी लोकमान्य सोसायटीचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर, संचालक गजानन धामणेकर, विठ्ठल प्रभू आणि सई ठाकूर-बिजलानी उपस्थित होते. ‘संगीत आणि संस्कृतीच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणण्याचा हा आमचा प्रयत्न आहे,’ अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
ज्येष्ठ गायिका पद्मभूषण उषा उथुप यांनी रंगमंचावर प्रवेश करताच संपूर्ण सुला विनयार्ड्स परिसर टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेला. आपल्या आवाजात आणि विशिष्ट शैलीत त्यांनी एकापेक्षा एक लोकप्रिय गाणी सादर करत उपस्थित नाशिककरांना उत्साहित केले. कार्यक्रमाच्या विशेष सत्रात उषा उथुप यांचा लोकमान्य सोसायटीच्यावतीने गौरव करण्यात आला. हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी नाशिक पोलीस विभाग, ग्रामपंचायत आणि आय.पी.आर.एस. यांचे विशेष सहकार्य लाभले.