ऑडी इंडियाची 2015 नंतर सर्वोत्तम कार विक्री
2023 मध्ये 7931 कार्सची विक्री : 89 टक्के वाढ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जर्मनीतील प्रसिद्ध लक्झरी कार निर्माती कंपनी ऑडी इंडियाने 2023 कॅलेंडर वर्षामध्ये 7931 कार्सची विक्री करण्यामध्ये यश मिळवले आहे. एकंदर किरकोळ कार विक्रीचा विचार करता ही वाढ जवळपास 89 टक्के अधिक आहे. 2015 सालानंतर पाहता भारतातील ऑडीची ही सर्वाधिक विक्री मानली जात आहे.
नव्या मॉडेलचे सादरीकरण यासह इतर गोष्टींमुळे कंपनीला विक्रीमध्ये वाढ करता आली आहे. 2023 च्या चौथ्या तिमाहीमध्ये 94 टक्के इतकी कार विक्रीत वाढ दिसून आली आहे. 2401 कार्सची विक्री चौथ्या तिमाहीत कंपनीला करता आली आहे. मागच्या वर्षी कंपनीने तीन मॉडेलचे सादरीकरण केले होते. त्यात क्यू3 स्पोर्ट बॅक, क्यू 8 इट्रॉन आणि क्यू8 स्पोर्ट बॅक इट्रॉन यांचा समावेश होता. याशिवाय ए4, ए6 आणि क्यू5 मॉडेलदेखील कंपनीने बाजारात आणले होते.
इतकी आहेत शोरूम्स
वर्षाच्या अखेरपर्यंत कंपनीची एकूण 64 टच पॉइंटस् ( शोरूम्स आणि वर्कशॉप) तसेच 25 ऑडी अप्रूव्ह प्लस शोरूम्स झाली आहेत. 2024 मध्ये देखील शोरूम्सची संख्या वाढवण्याचा कंपनीचा विचार असेल. चार पैकी एक ग्राहक ऑडीचे मॉडेल पुन्हा खरेदी करण्यासाठी इच्छुक असल्याची बाबही दिसून आली आहे.