नूतनीकरण न केलेल्या मद्यविक्री परवान्यांचा लिलाव
579 मद्य दुकानांच्या लायसन्ससंबंधी राज्य सरकारचा निर्णय : अबकारी मंत्री आर. बी. तिम्मापूर यांची माहिती
बेंगळूर : दीर्घ काळापासून मद्य दुकाने न उघडलेल्या आणि परवान्याचे नूतनीकरण न केलेल्या बार मालकांना राज्य सरकारने धक्का दिला आहे. मागील वर्षभरापासून कार्यरत नसणारी सुमारे 579 मद्य दुकानांच्या लायसन्सचा (परवाना) लिलाव करण्याचा निर्णय अबकारी खात्याने घेतला आहे. यासंबंधी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. लवकरच परवाने लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात येईल, अशी माहिती अबकारी मंत्री आर. बी. तिम्मापूर यांनी दिली. बेंगळूरमध्ये गुरुवारी पत्रकारांशी ते बोलत होते. मुदत संपलेल्या मद्यविक्री परवान्यांच्या लिलावाच्या प्रक्रियेची अबकारी खात्यामार्फत तयारी सुरू आहे. लिलाव प्रक्रियेत आरक्षण देण्याचा विचार सुरू आहे. अलीकडेच या प्रक्रियेबाबत मसुदा अधिसूचना जारी करण्यात आली आहे. शक्य तितक्या लवकर मद्यविक्री परवान्यांचा लिलाव पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले.
आरक्षणावर आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा
सामान्य पद्धतीने लिलाव करावा की आरक्षण देऊन लिलाव करावा, याबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी शुक्रवारी चर्चा करणार आहे. लिलाव प्रक्रियेतून 2 हजार कोटी रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहेत. कोणत्याही कारणास्तव नव्या मद्य दुकानांसाठी परवाने देणार नाही. सध्या असणारे परवाने लिलाव पद्धतीने दिले जातील, असेही मंत्री आर. बी. तिम्मापूर यांनी स्पष्ट केले.