For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तयार कपड्यांच्या व्यवसायातील आकर्षक संधी

06:20 AM Jul 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
तयार कपड्यांच्या व्यवसायातील आकर्षक संधी
Advertisement

आज जागतिक स्तरावर भारतातील तयार कपडे निर्मिती उद्योगाने व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाचे स्थान व महत्त्व प्राप्त केले आहे. या संदर्भातील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे भारतातील तयार कपड्यांच्या कौशल्यासह त्याला लाभलेली भारतीय धर्तीच्या कला कुसरीने जगाला भुरळ घातली आहे.

Advertisement

यामागे देशांतर्गत विविध शैलीच्या कलेची व कारागिरीची साथ या व्यवसायाला परंपरागत स्वरुपात लाभलेली साथ आजही कायम असून भारतीय तयार कपडे उद्योगाला अधिक रंगतदारच नव्हे तर अर्थपूर्ण बनवत आहे.

सकृतदर्शनी व संख्यात्मक स्वरुपात सांगायचे म्हणजे भारतातील तयार कपडे उद्योगाचे देशाच्या सकल घरेलु उत्पादन म्हणजेच जीडीपीमध्ये 2.3 टक्के तर देशांतर्गत एकूण औद्योगिक उत्पादन क्षेत्रात 13 टक्के एवढे उल्लेखनीय योगदान आहे.

Advertisement

मुख्य म्हणजे भारताच्या एकूण निर्यातीमध्ये तयार कपड्यांच्या निर्यातीचे प्रमाण 12 टक्के एवढे आहे. राष्ट्रीय स्तरावरील रोजगार संख्येच्या संदर्भात सांगायचे म्हणजे या उद्योगात प्रत्यक्षाप्रत्यक्ष स्वरुपात काम करणाऱ्या कामगार-कारागिरांची संख्या 45 दशलक्षच्या घरात आहे. यावरून सुद्धा या भारतीय व्यवसायाची वैश्विक व्यापकता स्पष्ट होते.

याचाच परिणाम म्हणजे आज विद्यार्थ्यांपासून व्यावसायिकांपर्यंत साऱ्यांसाठी आज तयार कपडे हे क्षेत्र आकर्षणाचा विषय ठरला आहे. यालाच नव्याने जोड मिळाली ती सरकारच्या सकारात्मक धोरणांची. त्यामुळे तयार कपडे बनविण्याच्या व्यावसायिक प्रक्रियेला मोठी व वाढती बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.

ग्राहकांच्या बदलत्या गरजा समजून घेऊन तयार कपड्यांना नवे व आकर्षक रुपडे प्राप्त झालेले दिसते. मुख्य म्हणजे या व्यवसाय क्षेत्रातील ग्राहकीला वयोमर्यादेचे असे बंधन नसते. त्यामुळे ग्रामीण-शहरी, गरीब-श्रीमंत अशा सर्व गट आणि वयोगटातील ग्राहकांना तयार कपड्यांची बाजारपेठ केवळ सामावूनच घेते असे नव्हे तर सतत आकर्षितदेखील करते.

परिणामी आज युवकांपासून महिलांपर्यंत फार मोठ्या संख्येने तयार कपडे क्षेत्राकडे स्वाभाविकपणे आकर्षित होत आहेत. याला या व्यवसाय क्षेत्रातील विशेष शिक्षण-प्रशिक्षण क्षेत्राची विशेष साथ लाभली आहे. या क्षेत्रातील वाढत्या व नव्या व्यावसायिक गरजा लक्षात घेऊन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन मॅनेजमेंट अंतर्गत डिपार्टमेंट ऑफ फॅशन मॅनेजमेंट स्टडीजची स्थापना करण्यात येऊन त्याद्वारे नव्या विद्यार्थ्यांशिवाय या क्षेत्रात काम करणाऱ्या कारागिरांना विशेष प्रशिक्षण, मार्गदर्शन केले जाते. यामुळे शिक्षणार्थ्यांचे ज्ञान आणि कौशल्यात तर भर पडतेच. शिवाय त्यातून नव्या व आकर्षक स्वरुपाच्या कपडे निर्मिती व निर्यातीला चालना मिळू लागली आहे हे विशेष. त्यामध्ये आता तयार कपड्यांच्या किरकोळ व ठोक निर्मितीद्वारे त्यांची फायदेशीर विक्री करण्याच्या दृष्टीने विक्री-व्यवसायाचे विशेष मार्गदर्शन केले जाते.

अशा प्रकारे तयार कपडे निर्मिती-व्यवसायाचा आता नवे व आकर्षक करिअर क्षेत्र म्हणून प्राधान्याने विचार केला जाताना दिसतो. या क्षेत्राचा अभ्यासक्रमासह विचार करणे महत्त्वाचे ठरते. त्यातही पण कपड्यांच्या फॅशन-पद्धतीला नेहमीच सर्वाधिक महत्त्व व पसंती देण्यात आल्याने त्याचा विविध अभ्यासक्रमांतर्गत प्रामुख्याने विचार करणे आवश्यक ठरते.

वर नमूद केल्याप्रमाणे फॅशन डिझाईन-टेक्नॉलॉजी

व व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थी-उमेदवारांना खालीलप्रमाणे करिअर पर्याय उपलब्ध असतात व त्यांच्या कामकाजाचे स्वरुप सर्वसाधारणपणे पुढीलप्रमाणे असते.

?        फॅशन व रिटेल मॅनेजर-तयार कपड्यांच्या व्यवसायवाढीसाठी विक्री केंद्रांचे नियोजन करून विक्री व्यवस्थापनाला चालना देणे.

?        ब्रँड मॅनेजर-तयार कपड्यांच्या व्यवसाय क्षेत्रात नाविन्य, फॅशन व विविधता याच्याच जोडीला विशिष्ट व्यावसायिक कंपनीच्या वैशिष्ट्यांची ग्राहकांकडून आवर्जुन दखल घेण्यासाठी विशेष चिन्हासह व्यावसायिक पार्श्वभूमीची निर्मिती व जतन करणं आवश्यक असतं. यामध्ये दर्जेदार सातत्य राखण्यासाठी ब्रँड मॅनेजमेंटची नेहमीच गरज असते.

?        विक्री-नियोजन व्यवस्थापक-विविध प्रसंग, सणवार एवढेच नव्हे तर ऋतू कालमानानुसार तयार कपड्यांचे उत्पादन व त्याच्या वितरण विक्रीचे नियोजन करावे लागते.

?        मागणी-पुरवठा विभाग व्यवस्थापक-कपड्यांची प्रत्यक्षात होणारी विक्री, चोखंदळ ग्राहकांची पसंती, विशिष्ट प्रकारच्या मालाला मिळणारा प्रतिसाद या साऱ्यांचा अभ्यास करून पुरवठा विषयक धोरण आखून त्याची नियोजनबद्ध स्वरुपात अंमलबजावणी करणे.

?        ऑनलाईन विक्री-व्यवस्थापक-सध्याच्या परिस्थितीत भौगोलिकदृष्ट्या दूरवरच्या ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी ई-कॉमर्स पद्धतीच्या माध्यमातून विक्री व्यवसायाचे नियोजन व व्यवस्थापन करणे.

?        कलाकुसरीसह काम करणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देणे-तयार कपड्यांच्या उत्पादन-विक्री व व्यवस्थापनामध्ये नाविन्यपूर्ण व कलात्मकतेला सर्वाधिक वाव असतो. यामध्ये विविधता व सातत्य आणण्यासाठी छोटेखानी पद्धतीने पण कलात्मक स्वरुपात कपडे तयार करणाऱ्या कारागीर उद्योजकांना प्रोत्साहन व मार्गदर्शन करणे.

?        आर्थिक विक्री व्यवस्थापन : याशिवाय तयार कपड्यांच्या वितरण-विक्री वाहतूक व व्यवस्थापनाद्वारे रोजगार निर्मिती होऊ शकते. तयार कपडे क्षेत्रात उपलब्ध असणाऱ्या विविध संधींचा करिअर-व्यवसाय वा उद्योजकता क्षेत्रात लाभ घेण्यासाठी विविध शैक्षणिक पात्रता व वयोगटातील स्त्री पुरुषांना संधी उपलब्ध होऊ शकते. उद्योजक म्हणून स्वत:चे वा आपल्या सहकाऱ्यांसह काम सुरु करायचे असल्याने मर्यादित भांडवलासह व्यवसाय सुरु करता येतो. मात्र त्यासाठी संबंधितांनी आपल्या कौशल्याला कल्पक-कलात्मकतेची जोड दिल्यास प्रयत्नांती यश सहज शक्य होते.

दत्तात्रय आंबुलकर

Advertisement
Tags :

.