Kolhapur | संकष्टीनिमित्त श्री वृक्षगणेश मंदिरात आकर्षक आरास; भाविकांची गर्दी
कळंबा वृक्षगणेश मंदिरात देखणी सजावट
कळंबा : कळंबा-गारगोटी महामार्गावरील कळंबा गावचे श्रद्धास्थान असलेल्या श्री वृक्षगणेश मंदिरात संकष्टी चतुर्थीनिमित्त आकर्षक पूजा आणि देखणी आरास साकारण्यात आली. आंब्यांची फळे, हिरवीगार पाने आणि फुलांच्या सजावटीने वृक्षगणेशाचे रूप खुलून दिसत होते. या विशेष पूजा श्री पूजक ओंकार नरके यांनी बांधली होती.
संकष्टीनिमित्त पहाटेपासूनच मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. कळंबा परिसरासह करवीर तालुक्यातील विविध भागांतून आलेल्या हजारो भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. दिवसभर गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.
अर्जुन वृक्षाच्या बुंध्यात नैसर्गिकरित्या प्रकट झालेल्या गणेशरूपामुळे श्री वृक्षगणेशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. स्व. रमेश नरके यांनी सर्वप्रथम या रूपाची पूजा सुरू केली. त्यांच्या श्रद्धेतून उभे राहिलेले हे स्थान आज पंचक्रोशीतील गणेशभक्तांचे प्रमुख श्रद्धास्थान बनले आहे. कळंबा तलावाच्या निसर्गरम्य सानिध्यात वसलेले हे ठिकाण भाविकांना आध्यात्मिक समाधान देत आहे.
नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असलेल्या श्री वृक्षगणेशाच्या दर्शनासाठी संकष्टी, गणेश जयंती आणि इतर धार्मिक उत्सवांनाही मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित राहतात. संकष्टीनिमित्त केलेली श्री गणेशाची आरास आणि विशेष पूजा भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.