क्षेत्ररक्षण समस्या सोडविण्यासाठी वृत्तीत बदल हवा : हॅडिन
वृत्तसंस्था/ सिडनी
ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टिरक्षक-फलंदाज ब्रॅड हॅडिनच्या मते, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्यांच्या क्षेत्ररक्षणाच्या समस्यांतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना त्यांनी वृत्तीत बदल करण्याची आवश्यकता आहे. भारतीय क्षेत्ररक्षकांनी, विशेषत: यशस्वी जैस्वालने अनेक झेल सोडले आणि परिणामस्वरुप गिलच्या संघाला हेडिंग्ले येथे झालेल्या पहिल्या कसोटीत पाच गड्यांनी पराभव पत्करावा लागला आणि बेन स्टोक्सच्या संघाविरुद्ध 0-1 असे पिछाडीवर पडावे लागले. ऑस्ट्रेलियासाठी 66 कसोटी सामने खेळलेल्या आणि 6,500 हून अधिक धावा केलेल्या 47 वर्षीय हॅडिनने म्हटले आहे की, वेगवेगळ्या काळातील सर्व महान क्रिकेट संघांचे चांगले क्षेत्ररक्षण हे वैशिष्ट्या होते.
जर तुम्हाला चांगले क्षेत्ररक्षण करायचे असेल आणि संपूर्ण वेळ स्पर्धा करायची असेल, तर वृत्तीमध्ये बदल करणे आवश्यक आहे, असे हॅडिनने पुढे म्हटले आहे. या वर्षीच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये भारतीय खेळाडूंचे खराब क्षेत्ररक्षण स्पष्टपणे दिसून आले, याकडे लक्ष वेधताना हॅडिन म्हणाला की, दोन महिने चाललेल्या सदर टी-20 स्पर्धेत झेल पकडण्याच्या बाबतीत कामगिरी अपेक्षेप्रमाणे नव्हती.
या वर्षी आयपीएलमध्ये झेल पकडण्याच्या बाबतीत कामगिरी भयानक होती. आपण प्रतिभावान गोलंदाज आणि फलंदाजांबद्दल बोलतो, पण झेल पकडणे हीच खरी समस्या होती, असे मत त्याने व्यक्त केले. भारताकडे असलेल्या प्रतिभेचा विचार करता जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षण संघ बनण्यापासून भारताला काहीही रोखू शकत नाही, असेही त्याने म्हटले आहे.