For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

किलोत सापडणाऱ्या गांजाकडे लक्ष ; पण पुडीकडे दुर्लक्ष

11:28 AM Jan 24, 2025 IST | Radhika Patil
किलोत सापडणाऱ्या गांजाकडे लक्ष   पण पुडीकडे दुर्लक्ष
Advertisement

कोल्हापूर / संतोष पाटील : 

Advertisement

गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणलेला गांजा पकडला, ही तशी जमेची बाजू. मात्र शहरातील पानटपऱ्यांवर सहज उपलब्ध होणाऱ्या गांज्याकडे यंत्रणेचा होणारा कानाडोळा आश्चर्यचकीत करणारा आहे. गांजा किलोत पकडला जातोय, मात्र पुडीत विक्री होणाऱ्या गांज्याकडे यंत्रणा दुर्लक्ष करत आहे. स्वस्त आणि सहज उपलब्ध होत असल्याने शहरातील काही ठिकाणे तर नशेबाज तरुणाईचे हॉट स्पॉटच आहेत. तरुणाईला गांज्याच्या धुराची गुंगी कमी पडू लागल्यानेच नशा वाढवण्यासाठी झुरक्याच्या जोडीला अनेक प्राणघातक औषधांचा वापर होत आहे. या नशेबाज तरुणाईवर कुटुंबासह यंत्रणेने वचक न ठेवल्यास अल्पावधीत कोल्हापूरचा उडता पंजाब होण्याचा धोका आहे.

काही वर्षापूर्वी अनुराग कश्यप यांचा ‘उड़ता पंजाब’ सिनेमा आला होता. त्यामध्ये पंजाबमधील तरुण पिढी अंमली व्यसनांमुळे कशी बरबाद होते, हे दाखवले होते. अगदी तशीच कोल्हापुरातही सुरूवात झाल्याचे चित्र आहे. खुलेआम नशेबाजीमुळे ‘उडता पंजाब’च्या धर्तीवर ‘डुलता अँड झिंगता कोल्हापूर’ असे म्हणण्याची वेळ येऊ नये, यासाठी आतापासून ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.

Advertisement

गेल्या काही महिन्यापासून दहा किलोपासून अगदी 90 किलोपर्यंत विक्रीसाठी आणलेला गांजा पोलिसांना सापडला आहे. याचा अर्थ गांजाची मागणीही वाढली आहे. विक्रीसाठी आणलेला गांजा पकडण्यात पोलिसांना यश येत आहे. मात्र जेथे याची विक्री होते, ती ठिकाणे बहुसंख्य नशेबाजांना माहिती आहेत. खुलेआम जेथे विक्री होते तरीही तेथे पोलीस कारवाई का करत नाहीत, हा प्रश्न आचंबित करणारा आहे.

कोल्हापुरात गांजा कर्नाटक आणि तेलंगणांमधून येतो. चॉकलेट एवढ्या लहान आकारातील पुड्यांतून कोल्हापुरात तो सहज उपलब्ध होतो आहे. काही ठिकाणी पान आणि माव्यातून गांजा मिळतो. ही ठिकाणे शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सक्रिय असून यंत्रणा त्याकडे कानाडोळा करते. यंत्रणेने दुर्लक्ष करण्यामागे मोठे अर्थकारण असल्याची चर्चा आहे. गांजासाठीचा कोडवर्ड ‘माल’ आहे. पोलीस यंत्रणेने व्यापक समाजहित म्हणून गांजा विक्री आणि व्यसनाविरोधात विशेष मोहीम उघडण्याची गरज आहे.

राज्यात 2011-2012 च्या आसपास गुटखाबंदी झाली. त्याची कडक अंमलबजाणी लगेच सुरू झाली. आजही अगदी मोजक्याच ठिकाणी गुटखा मिळत असल्याने त्याची किंमतीही अधिक आहे. विविध पानटपऱ्या, भाजी मंडई, उपनगरात गांजा अगदी 30 रुपयांपासून सहज उपलब्ध होत असताना विक्रीची ठिकाणे यंत्रणेला माहिती नाहीत, असे म्हणणे मुर्खपणाचे ठरेल.

  • अर्थकारण आणि यंत्रणा

गांजाची नशा कमी पडते म्हणून तरुणाई ट्रामॅडॉल आणि इपेड्रीनसारख्या औषधांचा वापर नशेसाठी करत आहे. अगदी 20 रुपयात 10 गोळ्या मिळतात. गांजाचे शरीरावर साईड इफेक्ट होतातच, आता या औषधामुळे स्मृतीभ्रंश, पोटविकार, आदी गंभीर आजारांचा सामना नशेबाज तरुणाईला करावा लागणार आहे.

गांजाच्या सेवनाने ती व्यक्ती वेगळ्या जगात वावरते. गांजाच्या सवयीमुळे शिकणाऱ्या मुलांचं शैक्षणिक नुकसान तर होतेच आहे. कामावरही परिणाम होत आहे. शरीरावर या गांजाचा खूप मोठा प्रभाव पडतो आहे. गांजामुळे डोळे आत जातात, छाती आत जाते, ओठ काळे पडतात. स्मृतीभ्रंश, पोटाचे गंभीर आजार गांजामुळे उद्भवत असल्याचे वैद्यकीय तज्ञ सांगतात.

Advertisement
Tags :

.