For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा

12:39 PM May 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा
Advertisement

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे आवाहन

Advertisement

बेळगाव : कन्नडसक्ती विरोधातील आंदोलनात निष्पाप मराठी भाषिकांना हौतात्म्य आले. कित्येकांना अटक करून तुरुंगात डांबण्यात आले. हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण ठेवून सीमाप्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहणे गरजेचे आहे. याचाच एक भाग म्हणून सोमवार दि. 1 जून रोजी सकाळी 8.30 वाजता हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे अभिवादन करण्यात येणार असून सर्व मराठी भाषिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी केले.

बुधवारी युवा समितीची महत्त्वाची बैठक टिळकवाडी येथे पार पडली. प्रारंभी मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी व ज्येष्ठ नेते अर्जुन गोरल तसेच इतर समिती कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ते पुढे म्हणाले, कर्नाटक सरकारने डॉ. गोकाक अहवाल मान्य केल्यानंतर सर्व ठिकाणी कन्नड भाषेची सक्ती करण्यात आली. त्याला विरोध दर्शविण्यासाठी समितीच्यावतीने सत्याग्रहाच्या माध्यमातून आंदोलन करण्याचे जाहीर करण्यात आले. 1 जून 1986 रोजी शरद पवार यांनी गनिमी काव्याने कित्तूर राणी चन्नम्मा चौकात दाखल होत सत्याग्रह केला. कर्नाटक सरकारने त्यांना अटक केली व त्यानंतर झालेल्या गोळीबारामध्ये नऊ निष्पाप मराठी भाषिकांना हौतात्म्य आल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

शैक्षणिक उपक्रम राबविण्याचा निर्णय

युवा समितीच्यावतीने मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून दरवर्षी शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येते. यावर्षी उपक्रमाचे नववे वर्ष असून 300 शाळांना साहित्य वितरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर बेळगाव शहर, तालुका व खानापूर विभागातील पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सूरज कुडूचकर, किरण हुद्दार, संतोष कृष्णाचे, अक्षय बांबरकर, सूरज चव्हाण, महांतेश अलगोंडी, अश्वजित चौधरी, रोहन कुंडेकर, आनंद पाटील, आकाश भेकणे, आशिष कोचेरी, प्रकाश हेब्बाजी यासह इतर उपस्थित होते.चिटणीस प्रतीक पाटील यांनी आभार मानले.

Advertisement
Tags :

.