For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शांत बेळगावच्या प्रतिमेला सुरुंग लावण्याचे प्रयत्न?

11:19 AM May 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
शांत बेळगावच्या प्रतिमेला सुरुंग लावण्याचे प्रयत्न
Advertisement

सोशल मीडियाचा वापर ठरतोय घातक : पोलीस आयुक्तांकडून कठोर कारवाईचा इशारा, शांतता बिघडवू पाहणाऱ्यांचा उद्देश काय? : जबाबदारपणे सोशल मीडियाचा वापर करण्याचे आवाहन

Advertisement

बेळगाव : संतिबस्तवाड, ता. बेळगाव येथे धर्मग्रंथ जाळल्याच्या घटनेनंतर बेळगावात अप्रिय घटनांची मालिकाच सुरू झाली आहे. त्यामुळे पोलीस दलाची पुरतीच झोप उडाली आहे. शांत बेळगावच्या प्रतिमेला सुरुंग लावण्याचे काम समाजकंटकांकडून केले जात आहे. या प्रकरणांच्या मुळापर्यंत जाऊन चौकशी केली तरच अस्थिरता निर्माण करण्यामागचे सत्य बाहेर पडणार आहे. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी ही प्रकरणे गांभीर्याने घेतली आहेत. संतिबस्तवाड येथील धर्मग्रंथ जळीतकांडाच्या तपासासाठी पाच स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली आहेत. त्या पथकातील अधिकारी व पोलीस सातत्याने आरोपींचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ही घटना उघडकीस येऊन आठ दिवस पूर्ण व्हायला आले तरी हे कृत्य कोणी केले, यामागचा त्यांचा उद्देश काय आहे? याचा उलगडा झाला नाही.

गेल्या सोमवारी 12 मे रोजी धर्मग्रंथ जाळल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी मुस्लीम समुदायातील युवकांनी राणी कित्तूर चन्नम्मा चौक परिसरात धरणे धरले. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा नेऊन निवेदन देण्यात आले. तीन दिवसात आरोपींच्या मुसक्या आवळू, अशी ग्वाही पोलीस आयुक्तांनी दिली होती. तीन दिवसात या प्रकरणाचा तपास करता आला नाही. ठरलेल्या मुदतीत आरोपींना अटक झाली नाही म्हणून शुक्रवार दि. 16 मे रोजी दुपारच्या नमाजनंतर 3 वाजता पुन्हा राणी कित्तूर चन्नम्मा चौक परिसरात हजारोंच्या संख्येने जमलेल्या मुस्लीम समुदायातील धर्मगुरु, नगरसेवक, राजकीय नेते व तरुणांनी निदर्शने केली. पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. पोलीस दलाने या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी आता आणखी आठ दिवसांची मुदत मागितली आहे.

Advertisement

पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये सुरू झालेला संघर्ष भारताने हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानवर केलेला स्ट्राईक आदींच्या पार्श्वभूमीवर देशभरात वातावरण तापलेले असतानाच बेळगावातील शांततेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न सुरू झाले आहेत. यासाठी सोशल मीडियाचा दुरुपयोग केला जात असल्याचे आजवरच्या घटनांवरून उघडकीस आले आहे. राणी चन्नम्मा चौक परिसरात झालेल्या आंदोलनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते. इन्स्टाग्रामवर ‘ऑपरेटिंग-लव्हर-29’ या पेजवरील व्यक्तीने आक्षेपार्ह कॉमेंट केल्यामुळे शनिवारी 17 मे रोजी पुन्हा तणाव निर्माण झाला. रात्री 11 नंतर शेकडो तरुणांनी शहापूर पोलीस स्थानकाला घेराव घातला. मध्यरात्री 1 वाजेपर्यंत अपमानास्पद कॉमेंट करणाऱ्याला अटक करावी, या मागणीसाठी पोलीस स्थानकाबाहेर घोषणाबाजी सुरू होती.

सातत्याने होणारे धरणे, घेराव, मोर्चे आदींमुळे पोलीस यंत्रणेचा बहुतेक वेळ बंदोबस्तासाठी खर्च होत आहे. त्यामुळे मूळ प्रकरणांचे तपास आहे तेथेच राहिले आहेत. शनिवारी रात्रीच्या घटनेनंतर पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग हे अॅक्शन मोडवर आले आहेत. कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा कायदेशीर परवानगी न घेता शेकडोंच्या संख्येने पोलीस स्थानकात किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी जमा होणे कायद्याच्या विरुद्ध आहे. अशा जमावावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे. शहरात शिस्त व कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे. त्यामुळे कोणतीही पूर्वकल्पना न देता जमाव जमवणे म्हणजे कायदा व सुव्यवस्थेला धक्का पोहोचविण्याचा प्रकार, असे गृहित धरून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देतानाच जात, धर्म कोणताही असो. आम्ही सगळे एक आहोत. बेळगावात पूर्वीपासून जातीय सलोखा नांदत आलेला आहे. या सलोख्याला कोणीही धक्का पोहोचवू नये, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले.

या सर्व घटनांना सोशल मीडियाचा गैरवापरच कारणीभूत असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांच्या लक्षात आले आहे. कोणत्याही जाती-धर्माचा अपमान करणारे किंवा बेळगावच्या शांततेला सुरुंग लावणारे आक्षेपार्ह पोस्ट कोणी केले तर तशांवर कारवाई करण्याचा इशाराही पोलीस आयुक्तांनी दिला असून अशा उपद्व्यापींची माहिती जवळच्या पोलीस स्थानकाला किंवा 112 वर द्यावी, असे आवाहनही रविवारी पत्रकारांशी बोलताना पोलीस आयुक्तांनी केले आहे. सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलच्या माध्यमातून सोशल मीडियावर सध्या काय सुरू आहे, यावर पोलीस दलाने नजर ठेवली आहे. अलीकडच्या अनेक अप्रिय घटनांना सोशल मीडियातील बॅड कॉमेंट्सच कारणीभूत आहेत. बेजबाबदारपणे केलेली एक कॉमेंट समाजाच्या शांततेला धक्का पोहोचवू शकते. त्यामुळे जबाबदारपणे सोशल मीडियाचा वापर करावा, असे आवाहनही पोलीस आयुक्तांनी केले आहे. सारा देश युद्धजन्य परिस्थितीचा सामना करत असताना सारे एकत्र येऊन शत्रू देशाविरुद्ध एकवटण्याऐवजी अंतर्गत शांतता बिघडवण्यात येत आहे. यामागे कोणती शक्ती कार्यरत आहे? त्यांचा उद्देश काय आहे? याचा तपास पोलीस दलाला करावा लागणार आहे.

Advertisement
Tags :

.