Crime News: टोळेवाडीच्या एकास सक्तमजुरी, पाच हजार रुपये दंड
जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीस शिक्षा सुनावली
कराड: एकास जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीस कराड सत्र न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंड, व दंड न भरल्यास एक महिन्याची कैद अशी शिक्षा सुनावली आहे. भीमराव सिताराम देवकांत (वय 64, रा. टोळेवाडी, ता. पाटण) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
7 जानेवारी 2019 रोजी सायंकाळी पाटण येथील लायब्ररी चौकामध्ये भीमराव देवकांत याने जुन्या भांडणाच्या रागातून नारायण गणपती डिगे (रा. टोळेवाडी) यास जिवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले होते. याबाबत पाटण पोलीस ठाण्यात देवकांत यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
या गुह्याचा तपास पाटण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यु. एस. भापकर यांनी करून न्यायालयात आरोपी विरोधात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्रीमती पी. जे. जाधव यांनी काम पाहिले. त्यांनी नऊ साक्षीदार तपासले आणि खटल्यातील शिक्षेवर जोरदार युक्तिवाद केला.
प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पंच व तपासी अंमलदार यांच्या साक्षी महत्त्वाच्या धरून आरोपी भीमराव देवकांत याला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती यु. एल. जोशी यांनी सक्त मजुरी आणि पाच हजार रुपये दंड, व दंड न भरल्यास एक महिन्याची साधी कैद, अशी शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षास पोलीस कॉन्स्टेबल पी. व्ही. भिंगारदेवे यांनी सहकार्य केले.