व्हॅक्सिन डेपो परिसरातील शोभेच्या दिव्यांचे खांब चोरीचा प्रयत्न
भंगारात विकण्याचा भुरट्यांचा डाव
प्रतिनिधी/ बेळगाव
व्हॅक्सिन डेपो येथे काही वर्षांपूर्वी सौंदर्यीकरणासाठी डेकोरेटिव्ह पथदीप बसविण्यात आले होते. यातील काही डेकोरेटिव्ह पथदीप मोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच मॉर्निंग वॉकर्सच्या हे लक्षात आल्याने हा प्रकार वेळीच थांबवावा, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे.
शहरालगत मोठ्या प्रमाणात वनसंपदा असलेली जागा म्हणजे व्हॅक्सिन डेपो. या ठिकाणी सकाळी व सायंकाळच्या वेळी व्यायाम करण्यासाठी टिळकवाडी परिसरातील नागरिकांची गर्दी होते. नागरिकांची सोय व्हावी, यासाठी पदपथ तयार करून पथदीप बसविण्यात आले. कास्टींग केलेले पोल मोडून ते भंगारात विक्री करण्याचा प्रयत्न काही जणांकडून सुरू आहे.
व्हॅक्सिन डेपोतील बऱ्याच ठिकाणचे पोल गायब आहेत. तर काही ठिकाणी पोल मोडून गवतामध्ये टाकण्यात आले आहेत. मोडलेले पोल रात्रीच्या वेळी व्हॅक्सिन डेपो बाहेर आणून त्यांची विक्री केली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे अशा प्रकारांवर आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.