सात बंद घरांचे कुलूप तोडून गुंजी-शिंपेवाडीत चोरीचा प्रयत्न
घरात वास्तव्यास कोणी नसल्याने ऐवजाविना चोरांचा बेत फसला
वार्ताहर/गुंजी
गुंजी आणि शिंपेवाडी गावात एकाच रात्रीत सात घरांचे कुलूप तोडून ऐवज चोरीचा प्रयत्न रविवारी केल्याने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. चोरट्यांनी या दोन्ही गावातील बंद घरांना लक्ष्य केले असून कटरने या घरांचे कुलूप तोडून आत प्रवेश केल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र या घरामध्ये कोणताही ऐवज न सापडल्याने चोरांचा चोरीचा बेत फसल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. गुंजी येथील चारही घरेही रणदेव कॉलनीत नवीन बांधण्यात आली असून या घरामध्ये वास्तव्यास कोणीही नव्हते. तर एका घरामध्ये येथील शाळेचे एक शिक्षक भाड्याने राहत होते. मात्र सुट्टी असल्याकारणाने तेही आपल्या गावी कुलूप लावून गेले होते.
त्यामुळे चोरट्यांना या घरांमध्ये कोणताही ऐवज सापडला नसल्याचे सांगण्यात येत आहे. गुंजी येथील देवाप्पा नेरसेकर, तुकाराम घाडी, शिक्षक नामदेव पाटील व मल्लू झपाटे यांच्या घराचे कुलूप तोडण्यात आले आहे. तर शिंपेवाडीमध्ये सचिन कंग्राळकर, बबन पाटील आणि कृष्णा पाटील यांच्या घराचे कुलूप तोडण्यात आले आहे. यामध्ये सचिन पाटील यांचे कुटुंबीय परगावी गेले होते. बबन पाटील यांचे गोठ्याचे घर तर कृष्णा पाटील हे कामानिमित्त परगावलाच राहतात. त्यामुळे या दोन्ही घरात चोरट्यांना काहीच सापडले नाही. मात्र सचिन पाटील यांचे हे राहते घर होते. त्यामुळे त्यांच्या घरातील ऐवजासाठी कपाटासह सर्व साहित्य चोरट्यांनी विस्कटून टाकले.
गुंजीतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू
घरात चोरी झाल्याची कल्पना सदर कुटुंबीयांना शेजाऱ्याकडून देण्यात आल्यानंतर त्यांनी गावाकडे धाव घेऊन घरातील ऐवजाची पाहणी केली असता सर्व काही सुरक्षित असल्याचे दिसून आले. सदर चोरीप्रकरण प्रकाशझोतात येऊ नये, या बेताने चोरट्यानी सर्व घरांना आपल्याकडील कुलूप लावून चोरीची घटना लपवण्याचा प्रयत्न केल्याचेही दिसून येते. या दोन्ही गावच्या चोरीप्रकरणी पोलिसांनी तातडीने धाव घेऊन पाहणी केली. त्याकरिता गुंजीतील काही सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात आले असून तपास सुरू आहे.
गुंजीत चार महिन्यांपूर्वीही चोरी
गुंजीत एप्रिल महिन्यातही चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून काही ऐवज लांबविला होता. त्याचा अद्याप तपासही लागला नाही. तोच पुन्हा गावात चोरीचा प्रयत्न झाल्याने नागरिकांत खळबळ माजली आहे. वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे भीतीचा प्रश्न निर्माण झाला असून पोलिसांनी गावात गस्त घालावी तसेच मागील चोरी प्रकरणांचा छडा लावावा व चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.