अवचारहट्टी येथे भरदिवसा चोरीच्या प्रयत्नाने खळबळ
किरकोळ रकमेवरच मानावे लागले चोरट्यांना समाधान
बेळगाव : चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोरांना हाती काहीच न लागल्याने घरातील साहित्य अस्ताव्यस्त टाकण्यात आल्याची घटना मंगळवारी अवचारहट्टी (येळ्ळूर) येथे उघडकीस आली. दुपारी 12 च्या सुमारास घराची कडी काढून चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यांच्या हाती किरकोळ रकमेशिवाय इतर काहीच लागले नाही. परंतु यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे. सध्या शेतीतील कामांना सुरुवात झाली असल्याने घरांना कुलूप घालून शेतकरी शेताकडे जात आहेत.
याचाच फायदा चोरट्यांकडून उचलला जात आहे. मंगळवारी अवचारहट्टी येथे भरदिवसा चोरट्यांनी घरात घुसण्याचा प्रयत्न केला. घराच्या मागच्या बाजूने दरवाजा उघडत बेडरूममध्ये प्रवेश केला. तिजोरीची चावी चोरट्यांच्या हाती लागल्याने कपाटातील साहित्य विस्कटून टाकले आणि किमती मुद्देमालाचा शोध घेतला. कपडे व इतर साहित्य वगळता चोरट्यांच्या हाती काहीच लागू शकले नाही. सदर चोरीचा प्रकार पाहता भुरट्या चोरट्यांनी हा चोरीचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. एकंदरीत चोरीच्या प्रकारामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे.