For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुरिअर कंपनीच्या कंटेनरला अडवून लुटमारीचा प्रयत्न

05:11 PM Dec 30, 2025 IST | अनुजा कुडतरकर
कुरिअर कंपनीच्या कंटेनरला अडवून लुटमारीचा प्रयत्न
Advertisement

मध्यरात्रीच्या घटनेने कुडाळात खळबळ ; चोरट्यांच्या ताब्यातील कारची वाहनांना धडक

Advertisement

कुडाळ -

मुंबई - गोवा महामार्गावर मध्यरात्री ब्लू डार्ट कुरिअर सर्व्हीसचा कंटेनर अडवून लुटमारीचा प्रयत्न करून पलायन करणाऱ्या चोरट्यांच्या ताब्यातील भरधाव वेगातील बलेनो कारने कुडाळ मुख्य रस्त्यावर (गीता हॉटेलसमोर ) जिल्हा बँकेच्या एटीएम व मंच्युरियन दुकानाला जोराची धडक दिली.नंतर त्याच वेगात कार पुन्हा रस्त्यावर 20 ते 25 मीटर जाऊन थांबली. या दरम्यान तेथे उभ्या करून ठेवलेल्या वॅगनार कारलाही धडक दिली. लुटमारीची घटना समजताच त्या कारचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांनी सदर बलेनो कार व चालकासह चार जणांना ताब्यात घेतले. थरार उडविणाऱ्या या घटनेने कुडाळ शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली. ही घटना सोमवारी मध्यरात्री 2.45 वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, लुटमार प्रकरणी एकूण सहा जणांना ताब्यात घेत गुन्हा दाखल करून अटक केली. याबाबतची फिर्याद मनोज कुमार पाल (( 31, मिर्जापूर - उत्तरप्रदेश ) यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली. मनोज पाल आपल्या ताब्यातील कंटेनर घेऊन मुंबईहून कुडाळच्या दिशेने येत होते.त्या कंटेनरमध्ये किंमती वस्तू होत्या. मुंबई-गोवा महामार्गावरून येत असताना बलेनो चालकाने हाताने इशारा करून कंटेनर थांबविण्याचा प्रयत्न केला. कंटेनर चालकाने घाबरून कंटेनर थांबविला नाही.नंतर सदर कारने पणदूरच्या पुढे ओव्हरटेक केला. तेथून तीन - चार किमी अंतरावर पुन्हा त्या कारमधील पाच ते सहा जण खाली उतरून कंटेनर थांबविण्याचा प्रयत्न केला.तसेच दगड मारून त्या कंटेनरची दर्शनी काच फोडली.कंटेनर चालकाने कंटेनर वेगात चालवून कुडाळ एमआयडीसी येथे ब्लू डार्ट च्या गोदामाकडे पोहोचले.तेथून कुडाळ पोलिसांना याबाबतची माहिती दिली. गस्तीवर असलेले उपनिरिक्षक गणेश कऱ्हाडकर यांनी सदर कारच्या वर्णनानुसार शोध घेत असताना ती कार कुडाळ येथे आढळली.तेव्हा त्या चालकाला थांबण्याचा इशारा केला. मात्र , तो कार घेऊन एस.एन देसाई चौक येथून कुडाळ बसस्थानच्या दिशेने पळाला.त्या कारचा पाठलाग पोलीस करीत होते. सदर कार भरधाव वेगात पळवित असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि कारने कुडाळ माठेवाडा येथील लक्ष्मी नक्षत्र टॉवर नजिकच्या जिल्हा बँकेच्या आणि एका मंच्युरियन दुकानाला जोराची धडक दिली. कार एवढी सुसाट होतो की,या धडकेनंतर सदर कार पुन्हा रस्त्यावर येत साधारण 20 ते 25 मीटर अंतरावर जाऊन थांबली. यात तेथे रस्त्याच्या बाजूला पार्किंग केलेल्या वॅगनार कारला जोराची धडक दिली. अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले.कार चालकासह कारमधील चार जणांना ताब्यात घेतले.या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात लुटमार तसेच अपघात असे दोन गुन्हे दाखल करण्यात आले.लुटमारप्रकरणी पोलिसानी सहा जणांना पोलीस ठाण्यात घेत अटक केली. ते सहाही स्थानिक असून 19 ते 21 वयोगटातील आहेत. संशयित सुजल सचिन पवार (21,रा. तेरसेबांबर्डे ), राहुल अमित शिरसाट ( 19 ,रा. कुडाळ), प्रशांत नितीन सावंत ( 24 ) व प्रज्वल नितीन सावंत (21,दोन्ही रा. वेताळबांबर्डे ), मंदार सोनू उमळकर ( 19,रा. कुडाळ) व राहुल सदानंद नलावडे ( 19 ,रा. पावशी ) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.यांच्यावर कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप पाटील करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.