Satara News : कोणेगावात खुनाचा प्रयत्न; तिघांना सक्तमजुरी
कोणेगावमध्ये किराणा दुकानासमोर हिंसाचार
उंब्रज : कोणेगाव (ता. कराड) येथे किरकोळ वादातून युवकावर चाकू आणि लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करणाऱ्या तिघा आरोपींना अतिरिक्त सत्र न्यायाधीश दिलीप भा. पतंगे यांनी तीन वर्षांची सश्रम कैद व प्रत्येकी १० हजार रुपये दंड अशी शिक्षा, तर दंड न भरल्यास एक वर्षे साध्या कारावासाची अतिरिक्त शिक्षा सुनावली आहे. तसेच फिर्यादीस १५ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. ६ डिसेंबर रोजी हा निर्णय निकाल देण्यात आला.
१३ नोव्हेंबर २०१९ रोजीकोणेगाव येथील बाळू नलवडे यांच्या त्रिमूर्ती किराणा दुकानासमोर हा हल्ला झाला होता. फिर्यादी सतीश तुकाराम जाधव (वय २५, रा. कोणेगाव) हा एका विधीसंघर्ष बालकाच्या तक्रारीसाठी त्याच्या मामांकडे गेला असता, त्यावरून आरोपी अक्षय संतोष पवार (२१), नवनाथ शामराव बाईंग (३५) आणि बापूसाहेब महिपती बाईंग (३४) यांच्यासोबत तणाव निर्माण झाला.
वाद चिघळताच अक्षय पवार याने "तुला जिवंत ठेवत नाही" असा दम देत फिर्यादीच्या पाठीवर चाकूने वार केला, तर अन्य दोघांनी लोखंडी रॉ डने मारहाण करत गंभीर जखमी केले. फ्रैक्चर होऊन जखमी अवस्थेत असतानाही फिर्यादीने उंब्रज पोलीस स्टेशनला धाव घेऊन तातडीने गुन्हा नोंदवला. या प्रकरणी गुन्डा क्रमांक ४५८/२०१९ दाखल करण्यात आला. १४ नोव्हेंबर २०१९ रोजी तिघा आरोपींना अटक करण्यात आली. एकूण १२ साक्षीदारांची नोंद घेण्यात आली असून, फिर्यादीसह प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी तसेच तपासी अधिकारी प्रवीण जाधव व सतीश मयेकरयांच्या साक्षी न्यायालयात निर्णायक ठरल्या. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक पी. एस. जाधव यांनी केला.
सरकारी बाजूने अभियोगी एम. व्ही. कुलकर्णी यांनी खटला चालवला. तपास व सुनावणी प्रक्रियेदरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांनी मार्गदर्शन केले. सविस्तर सुनावणीनंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश दिलीप भा. पतंगे यांनी तिन्ही आरोपींना तीन वर्षे सश्रम कारावास, प्रत्येकी १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. तसेच फिर्यादीस १५ हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.