For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दोन पीएसआयवर चाकूहल्ला करण्याचा प्रयत्न

10:51 AM Nov 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
दोन पीएसआयवर चाकूहल्ला करण्याचा प्रयत्न
Advertisement

आरोपीने स्वत: भोसकून घेऊन केला आत्महत्येचा प्रयत्न : खासबाग येथील घटनेने खळबळ

Advertisement

बेळगाव : दोघा पोलीस उपनिरीक्षकांवर चाकूहल्ला करण्याचा प्रयत्न करण्यासह आरोपीने स्वत:च्या पोटात तीन ते चारवेळा चाकूने भोसकून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना सोमवार दि. 17 रोजी दुपारी दीड वाजता वाली चौक खासबाग येथील वोडका बारजवळ घडली आहे. या प्रकरणी कारवार येथील यल्लापूर पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक राजशेखर चन्नाप्पा वंडली यांनी शहापूर पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून महम्मदरफिक उर्फ गुडीनबैलू रफीक इस्माईल रा. बंटवाळ, मंगळूर असे आरोपीचे नाव आहे.

फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक वंडली यांच्यासह त्याच पोलीस स्थानकाचे दुसरे पोलीस उपनिरीक्षक सिद्धाप्पा गुडी (वय 32) व पोलीस हेडकॉन्स्टेबल मोहम्मद शफी शेख (वय 44) हे जखमी झाले आहेत. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, आरोपी महम्मदरफीक याच्यावर कारवार येथील यल्लापूर पोलीस स्थानकात 2025 मध्ये कलम 305, 326 (जी), 62, 351 (4), बीएनएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. सदर आरोपी बेळगाव परिसरात फिरत असल्याची माहिती यल्लापूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी दोन पोलीस उपनिरीक्षक व हेडकॉन्स्टेबल असे तिघेजण बेळगावला आले होते. सोमवारी दुपारी 1.30 दरम्यान खासबाग येथील वाली चौकनजीकच्या वोडका बारसमोर पोलिसांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला.

Advertisement

त्यावेळी आरोपीने पँटच्या खिशातून चाकू काढून दोन्ही पोलीस उपनिरीक्षकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांनी हल्ला चुकविला. त्यावेळी पोलीस हेडकॉन्स्टेबल शेख यांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपीने त्यांना जोराने लाथ मारल्याने ते जखमी झाले. इतकेच नव्हेतर दोन्ही उपनिरीक्षकांना ढकलल्याने उजव्या हाताला व पायाला दुखापत झाली. सरकारी कामात अडथळा आणण्यासह पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीने स्वत:च्या पोटात तीन ते चारवेळा चाकू भोसकून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आरोपीच्या विरोधात कलम 132, 121 (1), (2), 226 बीएनएस कायदा 2023 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी आरोपीवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून यल्लापूर पोलीसदेखील बेळगावात तळ ठोकून आहेत.

Advertisement
Tags :

.